इगतपुरी भूमिअभिलेखचा भोंगळ कारभार

कागदपत्रे देण्यास टाळाटाळ; नागरिकांसह शेतकर्‍यांची दमछाक

इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी शहरात असलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांची मोठी दमछाक होत असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अरुण भागडे यांनी केला आहे.
शेतकरी व नागरिकांची कामे सुलभ व्हावी म्हणून शासनाने एक खिडकी योजना सुरू केली आहे. मात्र, या कार्यालयातील एक खिडकी योजना बंद पडलेली आहे. कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी विविध कामांचा रेट चार्ट लावलेला दिसत नाही. पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होताना दिसत असून, देवाणघेवाण करणार्‍या भूमाफिया व एजंट लोकांची कामे तातडीने होतात. अनेक वेळा बरेच कर्मचारी गैरहजर राहत असून, खुर्ची रिकामी दिसत असल्याने याबाबत विचारणा केली असता फिल्डवर किंवा मोजणी करण्यासाठी गेले असल्याचा बहाणा सर्रासपणे केला जात आहे.
रेकॉर्डसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असून, पैसे न दिल्यास रेकॉर्ड फाटलेले असल्याचा बहाणा केला जात आहे.
यामुळे गोरगरीब जनतेला विनाकारण फेर्‍या माराव्या लागत आहे. या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी हे मुख्यालयी न राहता नाशिक येथून जाऊन येऊन करत असल्यामुळे कर्मचारी कार्यालयीन वेळेवर हजर
राहत नसल्याचे पाहावयास मिळत आहे.
या कार्यालयातील कामकाजात पारदर्शकता व सुधारणा न केल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे नेते भागडे यांनी दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *