कांदा उत्पादक हवालदिल; उत्पादन खर्चही निघणे अवघड
लासलगाव : वार्ताहर
ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजारभावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान, साठवणुकीतील कांदा सडणे आणि बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. काही ठिकाणी तर उत्पादन खर्च निघणेही कठीण झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात आलेल्या या आर्थिक संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न हवालदिल झालेल्या
कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे.
आशिया खंडातील सर्वांत मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत गुरुवारी उन्हाळ कांद्याची अंदाजे 12000 क्विंटल आवक झाली व त्या कांद्याला कमीत कमी 400 रुपये, जास्तीत जास्त 1400 रुपये, तर सरासरी 1075 रुपये प्रतिक्विंटल असा बाजारभाव मिळाला. मात्र, उत्पादन खर्च प्रतिकिलो 10 ते 15 रुपये होत असल्यामुळे कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, तसेच नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही शेतकर्यांनी साठवून ठेवलेला कांदा सडत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
17 ऑक्टोबरपासून पुढील सात दिवस दिवाळीनिमित्त लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव होणार नसल्याने व सणासुदीला हातात दोन पैसे राहावेत, यासाठी शेतकर्यांनी कांदा विक्रीस आणल्याने पर्यायाने आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या कांद्याला मिळणार्या बाजारभावातून उत्पादनासाठी झालेला उत्पादन खर्चदेखील वसूल होत नाही. कांद्याच्या दरात वाढ होईल, या आशेने शेतकर्यांनी चाळीमध्ये कांदा साठवणूक करून ठेवला आहे. मात्र, हा कांदादेखील आता बदलत्या वातावरणामुळे सडत आहे. या संकटामुळे दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक कुटुंबांना पडला आहे. – सचिन होळकर, कृषितज्ज्ञ, लासलगाव
कोणतीही वस्तू
उत्पादन करताना
त्याचा भाव
ठरविण्याचा अधिकार
कारखानदार, व्यापार्यांना आहे, तर मग अथक कष्ट करून पिकविलेल्या कांद्यासह इतर शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आम्हाला का नाही? कांद्याला किमान प्रतिक्विंटल 2200 ते 2500 रुपये मिळेल, अशी व्यवस्था सरकारने करावी.
-सुनील गवळी, शेतकरी, ब्राह्मणगाव(विंचूर)