इस्पॅलिअर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साकारला भक्ती-संगीताचा संगम
नाशिक : प्रतिनिधी
भारतीय शास्त्रीय संगीत, अभंग, भक्तिगीते आणि कथक नृत्य यांचा अद्वितीय संगम संत स्वरांकुर-अभंगातून ईश्वरशोध या शास्त्रीय संगीत महोत्सवात पाहावयास मिळाला. इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलच्या पाचशे विद्यार्थ्यांनी भक्ती आणि संगीतातील कलाविष्काराचे दर्शन घडवत उपस्थित सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. निमित्त होते, इस्पॅलिअर हेरिटेज स्कूलच्या वार्षिक शास्त्रीय संगीत महोत्सव ‘संत स्वरांकुर- अभंगातून ईश्वरशोध’ या कार्यक्रमाचे. शिक्षण म्हणजे केवळ अभ्यासक्रम नव्हे, तर आत्म्याला स्पर्श करणारा अनुभव आहे याची अनुभूती विद्यार्थ्यांनी या संगीत कार्यक्रमातून करून दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अजय आंबेकर, ज्योती आंबेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात सीनिअर केजी ते दहावीपर्यंतच्या तब्बल पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय शास्त्रीय संगीत, अभंग गायन आणि कथक नृत्य यांचा अद्वितीय संगम सादर केला. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीचा उपयोग ओल्या दुष्काळाने प्रभावित शेतकर्यांच्या मदतीसाठी करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी शाळेचे संस्थापक संचालक सचिन उषा विलास जोशी आणि अध्यक्षा डॉ. प्राजक्ता जोशी यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे, तत्त्वज्ञानाची अनुभूती या कार्यक्रमातून प्रत्येक पालकांनी घेतली. कार्यक्रमाची सुरुवात जुगलबंदीने झाली. तबला, झेंबे, बॉडी पर्कशन आणि प्लास्टिक बँड अशा चार वाद्यांचा संगम 180 मुलांनी एकाच वेळी सादर केला.
हा कार्यक्रम वर्ल्ड रेकॉर्डसाठीचा एक प्रायोगिक प्रयोगही ठरला. संगीत शिक्षक ज्ञानेश्वर कासार, दीपा बक्षी, ओंकार कोडीलकर, वैष्णवी जाधव आणि विकी रोहम यांनी विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली. कार्यक्रमाचा शेवट ‘विठ्ठल आवडी प्रेमभाव, सावळे सुंदर रूप मनोहर, कानडा राजा पंढरीचा’ या तीन अभंगांच्या नव्या फ्युजन सादरीकरणाने झाला. पारंपरिक आणि आधुनिक संगीताचा अद्भुत मेळ घालणारी ही प्रस्तुती विद्यार्थ्यांच्या ऊर्जा आणि भावविश्वाने भारलेली होती.