गंगापूर रोडवरील केबीटी सर्कलवर वाहतुकीची कोंडी

नाशिक : यश भारती
गंगापूर रोडवरील केबीटी सर्कल आणि परिसरात संध्याकाळच्या वेळेस तीव्र वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऑफिस आणि शाळा सुटण्याची वेळ खरेदीसाठी बाजारपेठेत जाण्याची गर्दी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रहदारी आणि खासगी तसेच सार्वजनिक वाहनांची वाढती संख्या यामुळे या परिसरात वाहतुकीचा ताण संध्याकाळ च्या वेळेस अधिक वाढतो.
टूव्हीलर, फोरव्हीलर, बस आणि ऑटो रिक्षा यांची एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी पाहता वाहनचालकांना सर्कलच्या पुढे जाण्यासाठी खूप जास्त वेळ थांबावे लागते.अनेक वाहनचालक घाईगडबडीत एकमेकांना अडवतात आणि त्यामुळे अधिक गोंधळ होऊन ट्रॅफिक अजून वाढते. संध्याकाळी दहा ते पंधरा मिनिटांत सुटणारा रस्ता अनेकदा 15 ते 20 मिनिटे लागत असल्याचे नागरिक सांगतात.
दुचाकीस्वार लवकर पुढे पोचण्यासाठी दोन वाहनांच्या मधल्या बारीक जागेचा वापर करतात, तर चारचाकी वाहनांची रांग सर्कलच्या चारही बाजूंनी वाढत राहते परिणामी संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊन नागरिक वैतागून जातात.
नागरिक, वाहनचालक या गर्दीतून सुटण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात रस्ता कापून पुढे जाणे किंवा आडवे उभे राहून अडथळा निर्माण करणे असे प्रकार खूप वेळा होत असतात जर वाहतुकीचे नियम सर्व वाहनधारकांनी पाळले तर लवकरात लवकर वाहतूक कोंडी मोकळी होईल, असे एका नागरिकाने सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *