इगतपुरीत पिकांवर पाऊस अन् रोगाचा कहर

प्रत्यक्ष बांधावर पंचनाम्यांची मागणी; सर्वच भातशेती बाधित

घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. ऐन सोंगणी हंगामात अवकाळीची तर कृपा झालीच झाली, त्यात रोगानेही थैमान घातले आहे. मात्र, प्रशासनाच्या वतीने बांधावर जाण्याचे सौजन्य दाखवण्यात येत नाही. स्वतः शेतकर्‍यांनी जायचे आणि फोटो काढून संबंधित विभागाकडे जमा करायचे, असा एकंदरीत कार्यक्रम सुरू आहे.
दरम्यान, इगतपुरी तालुका आदिवासीबहुल असल्याने अनेक शेतकर्‍यांकडे अ‍ॅन्ड्रॉइड मोबाइलची सुविधा नाही. त्यामुळे फोटो काढणार तरी कसे आणि अधिकार्‍यांना देणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने महसूल विभाग व तालुका कृषी विभागाने थेट बांधावर जाऊन पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातून होत आहे. 29 हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जात आहे. त्यांपैकी जवळपास सर्वच क्षेत्रावर अवकाळीचा कहर आणि रोगाचे थैमान या दोन्ही बाजू एकत्रित जमले आहेत. रोगाने वाचवावे तर पावसाच्या तडाख्यात भातपीक जात आहे. सोंगणी केल्यानंतर साधारण दोन दिवस भातपीक वाळवले जाते. मात्र, इथे भात सोंगणी केल्यानंतर लगेच सडकून पळवताना शेतकर्‍यांची दमछाक होत आहे. शेतात गुडघ्यावर पाणी असून, महसूल व कृषी विभाग म्हणतो नुकसानच नाही. त्यामुळे दोन्ही विभागांच्या अधिकार्‍यांनी थेट शेतावर येऊन पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. दरम्यान, शेतकरी नेते अ‍ॅड. संदीप गुळवे यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे उपसभापती संपत वाजे यांनी तहसीलदारांंना निवेदन दिले आहे.

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. त्याचबरोबर रोगाचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, इगतपुरी तालुक्यातील तहसीलदार अभिजित बारवकर व तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांच्यामार्फत शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारची मदत होत नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी स्वतः बांधावर जात पंचनामे करून शेतकर्‍यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी.
– भगवान मधे, संस्थापक अध्यक्ष, एल्गार कष्टकरी संघटना

आता रोगामुळे पिके उद्ध्वस्त

मावा, करपा, तुडतुड्या रोगाने थैमान घातले असून, पिके उद्ध्वस्त होत आहेत. मात्र, तालुका कृषी विभाग अजूनदेखील शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *