सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांच्या नियुक्तीला विरोध
दिंडोरी : अशोक केंग
जिल्हा परिषद शाळेचा विकास व्हावा आणि जिल्हा परिषदेत आधुनिक शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे विशेष प्रयत्न करीत आहेत. शाळांमध्ये सीबीएससी पॅटर्न आणण्यासाठी शिक्षणमंत्री पुढाकार घेत असताना, त्यांच्या जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात जानोरी येथील शाळेत सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील शिक्षकांच्या नियुक्तीला पालकांचा विरोध आहे. शिक्षक बदली धोरणाविरोधात शाळेवर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू आहे. सोमवारी (दि. 3) द्वितीय सत्रात पदार्पण करत शाळा सुरू होत असताना जानोरी येथील शाळा विद्यार्थीविना भरल्याने एकच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जानोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये बहुतेक शिक्षक संवर्ग एकमधून बदलीने नियुक्त झाले आहेत. त्यांपैकी पुढील शैक्षणिक वर्षातच चार शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत, तर त्यापुढील वर्षी आणखी काही शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असणार्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना योग्य अध्यापन होऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान 50 टक्के शिक्षक तरी उपक्रमशील व तंत्रस्नेही, आधुनिक शिक्षक मिळावेत, या मागणीवर पालक ठाम आहेत.
जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाल्याला शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषद शाळा द्वितीय सत्राला प्रारंभ करीत असताना, जानोरी जिल्हा परिषद शाळेतील एकूण 232 पैकी एकही विद्यार्थी उपस्थित न झाल्याने विद्यार्थ्यांविनाच जिल्हा परिषदेची शाळा भरली. विशेष म्हणजे, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातच विद्यार्थीविना शाळा भरत असल्याने एक आश्चर्य मानले जात आहे. विद्यार्थीविरोधी शिक्षक बदली धोरणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने प्रशासन यावर तोडगा काढणार का?
असा सवाल उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषद शाळा ही शिक्षकांच्या का विद्यार्थी हितासाठी, हे ठरवण्याची वेळ आता प्रशासनावर आली आहे.
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान 50 टक्के शिक्षक बदलून मिळावेत. बदलून गेलेल्या शिक्षकांनाच कायम करत विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी पालकार्ंकडून होत आहे.
जानोरी जिल्हा परिषद शाळेत सोमवारी एकही विद्यार्थी शाळेत आलेला नाही. किमान 50 टक्के शिक्षक बदलून मिळण्याबाबत पालकांनी ठाम भूमिका घेतली आहे. बदलून गेलेल्या शिक्षकांना कायम करण्याबाबतही मागणी होत आहे. याबाबत पालकांची भूमिका वरिष्ठस्तरावर मांडून वरिष्ठांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सूचना गटशिक्षणाधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. लवकरच यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे.
– भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, दिंडोरीदोनशे बत्तीस पटसंख्या असलेल्या जानोरी शाळेत सोमवारी एकही विद्यार्थी हजर झाला नाही, ही आश्चर्याची बाब आहे. यावरून प्रशासनाने पालकांची मानसिकता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी किमान 50 टक्के शिक्षक बदलून द्यावेत. आतापर्यंत अध्यापन करणार्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली होती. त्यांनाच कायम करावे, अशी मागणी आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढत आम्हाला न्याय द्यावा.
-सुनीता बोस, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती