नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी अचारंसहिता लागली आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी शुक्रवारी (दि. 7) मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांसाठी एकूण 416 मतदार केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. तीन लाख 72 हजार 665 मतदार मतदान करणार आहेत. एकूण 131 प्रभाग असतील.
तब्बल तीन वर्षांपेक्षा अधिक काळ अडकलेल्या जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी 4 नोव्हेंबर रोजी अचारसंहिता लागली आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टिकोनातून अकरा नगरपरिषदांसाठी मतदान केंद्रे जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यातील मनमाड, येवला, सिन्नर, ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, इगतपुरी, सटाणा, भगूर, त्र्यंबकेश्वर आणि नांदगाव नगरपरिषदांसाठी निवडणूक होणार आहे. 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
दरम्यान, प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविल्यानंतर प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी 31 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. 1 जुलै 2025 ला अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे, असे निवडणूक अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पहिल्या टप्प्यात प्रभागरचना अंतिम करण्यात आली. त्यानंतर पुढील टप्प्यात मतदार यादीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
8 ऑक्टोबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रभागरचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर झालेल्या सुनावणींनतर प्रभागरचना अंतिम करण्यात आली होती. 31 ऑक्टोबरला मतदारयादी नगरपरिषदनिहाय जाहीर करण्यात आली. शुक्रवारी मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
नगरपरिषद एकूण प्रभाग एकूण मतदार प्रभागनिहाय मतदान केंद्रे एकूण जागा
इगतपुरी 10 25,077 30 21
नांदगाव 10 19,942 23 20
भगूर 10 12,255 16 20
ओझर 13 47,433 49 27
त्र्यंबकेश्वर 10 12,835 18 20
पिंपळगाव बसवंत 12 36,922 41 25
मनमाड 16 66,594 72 33
येवला 13 42,903 46 26
सिन्नर 15 54,387 58 30
सटाणा 12 34,940 41 24
चांदवड 10 19,377 22 20
एकूण 131 372665 416 266