माणसांनो, नका होऊ देऊ माणुसकीचा अंत!

जकाल माणुसकी हा शब्द केवळ नावालाच शिल्लक राहिला आहे. एकेकाळी माणसांमध्ये असणारी मानवता आता दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. माणसाने स्वतःमध्ये असणार्‍या मानवतेला नष्ट करून अमानुषतेचा कळस गाठला आहे. एकेकाळी माणसांमध्ये ठळकपणे दिसणारी माणुसकी आता अंधुक झाली आहे. आणि जिकडेतिकडे अमानुष लोकांचा बोलबाला झाला आहे. ज्यांच्यात माणुसकी ठासून भरली आहे आणि ज्यांच्याकडे बघताच माणुसकी ठळकपणे दिसते अशी माणसे हल्ली दुर्मिळ झाली आहेत.
मानवताहीन माणसांचा सुळसुळाट वाढल्यामुळे देशात बलात्काराचे व अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. माणसात माणुसकी नसल्यामुळे माणूस माणुसकीचा व्यवहार न करता हैवानासारखा वागत आहे. लहान मुलींपासून ते वयोवृद्ध आजीपर्यंत ते वखवखलेल्या वासनांध नजरेने पाहत आहेत. आपल्याच देशातील माता भगिनींवर बलात्कार करत आहेत. कॉलेजमध्ये जाणार्‍या व मोकळ्या हवेत फेरफटका मारायला जाणार्‍या महिला व मुलींवर सामूहिक बलात्कार केला जात आहे. समोर मुलगी दिसताच त्यांच्यामध्ये लपलेला राक्षस जागा होतो आणि ते बलात्कार करून मोकळे होतात. अशामुळे माणुसकी ओशाळत आहे. माणुसकीला कलंकित करणार्‍या घटना घडत असल्यामुळे आपल्या देशात महिला व मुली सुरक्षित नाहीत. महिलांना व मुलींना बाहेर फिरायचे मनसोक्त स्वातंत्र्य असूनसुद्धा महिलांना व मुलींना घरात बसवावे लागत आहे. मुलींना शहरी भागात शिकायला ठेवणेसुद्धा अवघड झाले आहे. कॉलेजमधील किंवा शाळेमधील शिक्षकच आपल्या विद्यार्थिनीवर बलात्कार करत आहेत. किंवा त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत आहेत. शिक्षकच मुलींकडे वासनांध नजरेने बघत असतील तर शिक्षकांकडून पालकांनी व विद्यार्थ्यांनी काय अपेक्षा ठेवावी?
नुकतीच बुलढाणा जिल्ह्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना वाचनात आली. एका मुलाने आपले आई-वडील शेती नावावर करत नाहीत म्हणून रात्री झोपेतच आई-वडिलांच्या डोक्यात धारदार कुर्‍हाडीने घाव घालून त्यांची हत्या केली. ही बातमी वर्तमानपत्रांत वाचून माझे मन सुन्न झाले. जन्म देणार्‍या आई-वडिलांचीच हत्या मुलाने करणे म्हणजे माणुसकीला शोभणारे नव्हे तर माणुसकीला कलंकित करणारे दुष्कृत्य आहे. अशा घटना घडणे काही नवीन नाही. मुलाने आई-वडिलांची हत्या करणे या घटना दररोज राजरोसपणे घडत आहेत. लग्न झाल्यावर बरीच मुले पत्नीचे ऐकून आई-वडिलांना अंतर देतात आणि आई-वडिलांपासून अलिप्त राहतात. आई-वडिलांचे हात जोपर्यंत थकत नाहीत तोपर्यंत मुले आपल्या आई-वडिलांना सांभाळतात. एकदा आई-वडील थकले आणि आई-वडिलांना बसून खायचे दिवस आले किंवा आई-वडिलांचा पैशाचा झरा बंद झाला की, मग या महाभागांना स्वतःचे आई-वडील जड वाटतात. त्यांना घराबाहेर काढतात किंवा वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. आई-वडिलांना रामभरोसे सोडतात. नंतर आई-वडिलांना बघायलादेखील जात नाहीत. आई-वडील मेलेत का जिवंत आहेत, याचा विचारदेखील करत नाहीत. ज्या आई-वडिलांनी स्वतःचे रक्त आटवून व स्वतःचे शरीर झिजवून यांच्यासाठी कष्ट केलेले असतात. यांना लहानाचे मोठे करून यांचे लग्न करून देतात आणि मग लग्न झाले की काही दिवसातच पत्नीचे ऐकून आई-वडिलांना घराबाहेर काढतात. असे प्रकार आपण सध्या सर्वत्र पाहत आहोत.
यावरून असे लक्षात येतेे की, माणसांमध्ये असणारी माणुसकी ही लयाला जाऊन माणूस अमानुष झाला आहे. हैवानासारखा व्यवहार करू लागला आहे. एकेकाळी सख्ख्या भावांमध्ये असणारा मायेचा गोडवा आता कडू झाला आहे. सख्खे भाऊ एकमेकांशी भांडत आहेत. जमीन नावावर करून देण्यासाठी आई-वडिलांना मारहाण करत आहेत. थोड्याफार जमिनीसाठी व संपत्तीसाठी हे महाभाग एकमेकांचा खून करण्यासाठी टपले आहेत. स्वार्थापायी माणसाला भाऊ कळत नाही ना आई-वडील. त्यांच्यासोबत राक्षसी व्यवहार करून माणुसकीला कलंकित करत आहेत. गुंठाभर जागेसाठी व इंचभर जमिनीसाठी सख्खे भाऊ पक्के वैरी बनून एकमेकांचे खून करत आहेत. खुशाल माणुसकीला काळिमा फासत आहेत.
माणूस स्वार्थी, लबाड, ढोंगी व कपटी बनला आहे. केवळ स्वतःचा आणि बायको-लेकरांचा विचार करत आहे. आई-वडिलांना व बहीणभावांना वार्‍यावर सोडत आहे. नातेवाइकांच्या अंत्यविधीला जात नाहीत. त्यांच्या लग्नाला किंवा इतर कार्यक्रमालासुद्धा जात नाहीत. त्यांच्या दुःखात सहभागी होत नाहीत. पण सुखात मात्र सगळेच धावून जातात, हीच शोकांतिका वाटते. आता माणसाने स्वतःमध्ये लपलेला दुष्ट राक्षस बाजूला काढून माणसासारखे वागावे. प्रत्येकासोबत माणसासारखा व्यवहार करून माणुसकीची शोभा वाढवावी. भावासोबत प्रेमाने व मायने वागावे. आई-वडिलांना व बहीणभावांना जीवापाड सांभाळावे. दुःखी, पीडित व गरजू लोकांच्या मदतीला धावून जावे. संकटात सापडलेल्या व्यक्तींना पोटतिडकीने मदत करावी. माणुसकी कलंकित होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. माणुसकीला जिवापाड जपून व मानवता हाच खरा धर्म समजून जनतेने माणसासारखे वागावे. माणुसकीचा अंत झाला तर देश विनाशाच्या उंबरठ्यावर असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *