नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात 12 हजार पाणपक्षी

5500 गवताळ पक्षी दाखल; थंडीची चाहूल लागल्याने संख्येत वाढ

निफाड तालुका : प्रतिनिधी
रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यात दरवर्षी हिवाळ्यातील स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असून, यंदा थंडीची चाहूल लागल्याने 12 हजार पाणपक्षी आणि 5500 गवताळ पक्षी दाखल झाले आहेत. आगामी काळात पक्ष्यांची संख्या वाढत जाणार आहे. सध्या हा परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने दुमदुमून गेला आहे. शनिवारी (दि. 8) केलेल्या प्रगणनेत पक्ष्यांची आकडेवारी समोर आली आहे.
उपवनसंरक्षक (वन्यजीव) नाशिक, सहाय्यक वनसंरक्षक हेमंत उबाळे, वन परिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच ही प्रगणना झाली. चापडगाव संकुल, खानगावथडी आणि आजूबाजूच्या परिसरात वनकर्मचारी, पक्षी अभ्यासक आणि स्थानिक पक्षीप्रेमींनी मिळून सकाळच्या वेळेत निरीक्षण करण्यात आले. या प्रगणनेत 12,000 पाणपक्षी आणि 5,500 गवताळ पक्ष्यांची नोंद झाली आहे.
यामध्ये ब्राह्मणी बदक, थापाड्या बदक, भुवई बदक, तलवार बदक, मोठा ठिपकेदार गरुड, दलदल ससाणा, लाल डोक्याचा चाराटी, पांढरा शराटी, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, कॉमन क्रेन, जांभळी पानकोंबडी, चमचा, कमळ पक्षी, लाल मुनिया, हळदीकुंकू, जांभळाबागला, राखी बगळा आणि तरंग अशा विविध प्रजातींचा समावेश आहे. या उपक्रमात वनपाल रुपेश दुसाने, वनरक्षक गोरख पाटील, के. डी. सदगीर, तसेच स्थानिक कर्मचारी गंगाधर आगाव, अमोल दराडे, विकास गारे, रोशन पोटे, रोहित मोगल, पंकज चव्हाण आणि संजय गायकवाड यांनी सहभाग नोंदवला. नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले रामसर घोषित पक्षी अभयारण्य असून, येथे जलाशय, पाणथळ प्रदेश व गवताळ परिसर पक्ष्यांसाठी आदर्श अधिवास निर्माण करतात. स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे ठिकाण एक सुरक्षित विश्रांतिस्थान ठरल्याने हिवाळ्यात पक्षी दरवर्षी येथे येतात. या आठवड्यात थंडीची चाहूल लागल्याने स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारत, तसेच सायबेरिया आणि मध्य आशियातून येणारे पक्षी लवकरच या परिसरात दाखल होतील, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.

पक्ष्यांच्या प्रगणनेद्वारे केवळ संख्येचा अंदाजच नव्हे, तर त्यांच्या निवासपद्धती, खाद्यसाखळी व पर्यावरणीय संतुलनाबद्दल महत्त्वाची माहिती मिळते. निसर्गाशी जिव्हाळ्याचे नाते जपणार्‍या या उपक्रमातून स्थानिक नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि अभिमानाची भावना अधिक दृढ होत आहे.
– अमोल एस कुडमेथे, पक्षी मित्र

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *