इगतपुरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये विकासकामे सुरू

इगतपुरी : प्रतिनिधी
गेल्या दोन पंचवार्षिक विधानसभेचे विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांना निवडून आणण्यासाठी इगतपुरी शहरातून जास्त मतदान करण्याचे खरे श्रेय राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष वसीम सय्यद यांना असून, पक्षश्रेष्ठींनीसुद्धा त्यांचा मोठा सिंहाचा वाटा असल्याची कबुली देत त्यांनाही समाजकार्याची संधी दिली आहे.
राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश उपाध्यक्ष फिरोज पठाण व माजी जि.प. सदस्य गोरख बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या निधीच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यासाठी शहराध्यक्ष वसीम सय्यद यांनी प्रभाग क्रमांक 5 मध्ये महिला आरक्षणामुळे त्यांची सौभाग्यवती निकहत वसीम सय्यद यांना उमेदवारी बहाल केली आहे. त्याच प्रभागातून माजी नगराध्यक्ष मंगलभाई यांचे नातू तथा राष्ट्रवादीचे युवानेते मकसूद खलिफा यांनाही उमेदवारी दिली आहे.
गेल्या तीस वर्षांपासून या प्रभागात कोणत्याही प्रकारची विकासकामे झाली नसल्याने मतदारांनी आता परिवर्तन व्हावे यासाठी या दोन उमेदवारांचे स्थानिक भागातून स्वागत केले आहे. प्रभाग क्रमांक 5 मधील स्थानिक विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक गरजा आणि संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींची सविस्तर चर्चा होऊन या उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद यांनी निवडणुकीच्या आधीच नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे काम सुरू केले असून, अनेक कामे या प्रभागात आमदार हिरामण खोसकर यांच्या निधीतून मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आले आहेत. प्रभागातील सर्व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभागातील रस्ते, भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावल्याने कामांना गती मिळणार असून, काही भागात प्रत्यक्षात कामेदेखील सुरू झाली आहेत.
प्रभाग क्रमांक 5 हा महिला राखीव असल्याने शहराध्यक्ष वसीम सय्यद यांच्या पत्नी निकहत वसीम सय्यद यांनी आत्तापासूनच महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी बचतगटांची स्थापना करण्यास सुरुवात केली आहे. त्या माध्यमातून सर्वच महिलावर्गांना घरबसल्या स्थानिक रोजगार कसा करावा, याची जाणीव करून दिली आहे. मुलींसाठी शिक्षण आणि गृहोद्योग व्यवसायासाठी प्रयत्नशील राहणार असून, प्रभागातील सर्वच नागरिकांच्या आरोग्याच्या विषयाकडे लक्ष राहणार असल्याचे युवानेते मकसूद खलिफा
यांनी सांगितले.

प्रभागातील विकासकामे

संतोष बाफना यांच्या घरापासून सिमेंट काँक्रिटीकरण करणे
( आमदार निधीतून )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून चांदवडकर यांच्या दुकानापर्यंत रस्त्याची कामे मंजूर झाली आहेत.

 

प्रभाग क्रमांक 5 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार

                                                             निकहत वसीम सय्यद

                                                             मकसूद खलिफा

 

पदाधिकारी म्हणतात…

इगतपुरीतील नागरिकांचे स्थलांतर थांबविण्यासाठी यंदाच्या निवडणुकीत परिवर्तन निश्चित होणार असून, महायुतीच्या उमेदवारांसह राष्ट्रवादीच्या उमेदवारांना नक्कीच यश मिळेल. आमदार निधीसह नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझी पत्नी निकहत वसीम सय्यद व माझे मित्र मकसूद खलिफा यांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
– वसीम सय्यद, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी

या आहेत समस्या

• गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडविल्या नाहीत.
• प्रभागातील रस्त्यांची कायमच दुरवस्था झाली असून, हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे.
• रस्त्यालगत गटारी उघड्यावर असल्याने सर्वत्र दुर्गंधी.
• पावसाळ्यात आठवड्यातून तीनदाच पाणीपुरवठा.

प्रभागात व्यायामशाळा बांधण्यासाठी
20 लाख रुपये मंजूर

 

अल्पसंख्याक निधीतून चार कामे मंजूर केले. त्यातील बुद्धविहार येथे पेव्हर ब्लॉक बसविले.

क्रबस्तान दुरुस्ती, शादीखाना, स्टेट बँकेपासून तर टाटिया यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे मंजुरीसाठी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *