सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २५ हजार कोटींची विकासकामे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नाशिक : प्रतिनिधी

आगामी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर येथे तब्बल २५ हजार कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कुंभमेळ्याच्या कामांच्या शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “सिंहस्थासाठी निधी कमी पडू नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही कटीबद्ध आहेत. सध्या सुमारे ६ हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ झाला असून, २० हजार कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सिंहस्थ सुरू होईपर्यंत एकूण २५ हजार कोटींची कामे पूर्णत्वास जातील.”

ते पुढे म्हणाले की, “नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून जे प्रकल्प उभारले जातील, ते पुढील २५ वर्षांपर्यंत टिकावदार आणि शाश्वत विकासाचे प्रतीक असतील. नाशिकचे रूपांतर आधुनिक धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून जगभरात व्हावे, हा आमचा उद्देश आहे.”

दरम्यान, २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असून, नाशिक आणि त्र्यंबकेश्‍वर परिसरात रस्ते, नदी विकास, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि धार्मिक सुविधा केंद्र अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे होणार आहेत.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे सविस्तर कव्हरेज वाचण्याकरता खालील संकेतस्थळावर अवश्य भेट द्या:

https://gavkarinews.com/category/simhastha-nashik/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *