निसर्ग स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी मनुष्य, प्राणी वनस्पती यात संतुलन ठेवतो. मात्र, गेल्या काही वर्षांत माणसाने निसर्गाला ओरबाडणे सुरू केले आहे. त्यामुळे काही प्राणी खाद्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. त्यांच्या पाठोपाठ बिबट्यांनीही मानवी वस्तीची वेस ओलांडली आहे. मानवाच्या कोणत्याही क्रियेवर निसर्ग प्रतिक्रिया देतच असतो. ज्यावेळी माणसे निसर्गाच्या संतुलनात ढवळाढवळ करतात तेव्हा निसर्ग त्यावरील प्रतिक्रिया देतो. गेल्या काही वर्षांत धरणासाठी, कधी रस्त्यांसाठी, कधी घरांच्या सजावटीसाठी माणसांनी जंगलावर कुर्हाड चालवली आणि आता निसर्ग त्यावरील आपली प्रतिक्रिया वेगवेगळ्या माध्यमातून देत आहे.बिबटे मानवी वस्तीकडे येण्यात केवळ जंगलतोड एकमेव कारण नाही. पूर्वापार गावांची वस्ती साधारण मध्यभागी होती. त्यानंतर मोकळा भाग, मग शेती आणि घनदाट जंगल, अशी गावांची रचना होती. शेती करण्याचे प्रमाण अधिक असल्याने वर्दळ असायची अशावेळी जंगलातील प्राण्यांना शेतीपर्यंत किंवा त्यापुढे येणे शक्य नव्हते. पण शेती करणे कमी झाल्याने मानवी वस्तीची वर्दळ कमी झाल्याने बिबटे मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. भटकी कुत्री, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या, इतकेच नाही, तर उंदीर, घुशी खाण्यात बिबट्याला अधिक रस वाटू लागला आहे. म्हणजेच जंगलतोडीमुळे माकडे मानवी वस्तीकडे आली. त्यापाठोपाठ बिबट्याही आला. त्याला कमी श्रमात खाणे मिळू लागल्याने मानवी वस्तीला अधिक पसंती देत असल्याचे दिसून येते. बिबट्यांची संख्या वाढत आहे. हे असेच सुरू राहिले तर प्रवासात कुठल्याही वळणावर बिबट्या दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी मानवाने निसर्गाच्या संतुलनाला धक्का लावू नये!
– राजू जाधव, मांगूर