प्रभाग क्रमांक 31
भौगोलिकदृष्ट्या प्रभाग क्रमांक 31 ची व्याप्ती मोठी आहे. या प्रभागात शहरासोबत ग्रामीण भागदेखील आहे. हा भाग अद्याप शेतीशी जोडला गेलेला आहे. त्यामुळे शहराची ग्रामीण भागाशी नाळ जोडली गेली आहे. नाशिक शहरात वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. चौपाटीपासून महागडी हॉटेल्स या परिसरात आहेत. पंचवार्षिक निवडणुकीत पहिले नवीन नाशिकचे सभापती होण्याची संधी या प्रभागातील नगरसेवक सुदाम डेमसे यांना मिळाली. तसेच भाजपा काळात नव्यानेच सुरू केलेल्या शहर सुधार समितीचे सभापती म्हणून भगवान दोंदे यांनी कारभार पाहिला. संगीता जाधव व पुष्पा आव्हाड या दोन्ही महिला नगरसेवकांना स्थायी समितीच्या सदस्य म्हणून काम करता आले. या सर्व नगरसेवकांनी संधीचे सोने करत विकासकामे करण्याचा प्रयत्न केला. यातून परिसरातील विद्याथ्यार्र्ंना अभ्यासासाठी सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात आली. त्यातून अनेक विद्यार्थी अधिकारी झाले. चेतनानगर येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. पाथर्डी-दाढेगाव रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्यात आले. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून अनेक समाजोपयोगी कामे या नगरसेवकांनी करून घेतली.
माजी लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळात या प्रभागात काही विकासकामे झाली असली, तरी अगदी प्राथमिक स्वरूपाच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. दाढेगाव येथील वालदेवी नदीवरील धोकादायक पुलाचे काम अनेक वर्षे रखडलेले आहे. या नदीवरील छोट्या पुलामुळे पावसाळ्यात जनावरे वाहून गेली आहेत. नागरिकदेखील वाहून गेले आहेत. त्यातील काहींना वाचवले गेले, तर काही प्रवाहात वाहून गेले. अनेक वेळा या पुलाचे भूमिपूजन झाले. मात्र, प्रत्यक्षात काम अजूनही झालेले नाही. कचरा डेपोतून येणार्या दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करू पाहत आहे. हे पाणी वाडीचे रान येथील नाल्याद्वारे थेट वालदेवी नदीपात्रात मिसळते. त्यामुळे या परिसरातील शेती, तसेच पिण्याचे पाणीही दूषित होऊ लागले आहे. येथील शेतकर्यांना ही जणू काही काळ्या पाण्याची शिक्षा झाली आहे.
आनंदनगर येथील पाण्याच्या टाकीमुळे परिसरातील पाणीप्रश्न सुटेल, असे वाटले होते. मात्र, यामुळे फार काही बदल जाणवला नाही. पाथर्डी फाटा परिसरात आजही रात्री उशिरा पाणी सोडले जाते. मुरलीधरनगरमध्ये रात्री पाणी येते, तेही अत्यंत कमी दाबाने. त्यामुळे महिलांना नळी लावून इतर ठिकाणाहून पाणी घ्यावे लागते. परिसरात दोन टँकर सुरू आहेत. त्याच्या सहाय्याने पाण्याची सोय केली जाते. निसर्ग कॉलनीमध्येदेखील अशीच परिस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षांत कॉलनी भागातील रस्त्यांची कामे झाली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. प्रशांतनगर भागात नाल्याची समस्या आहे. वासननगर परिसरात पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबते. बर्याच वेळा ते पाणी घरातदेखील शिरते.
महापालिकेत समाविष्ट होऊन 30 वर्षांचा प्रदीर्घ काळ लोटल्यानंतरही प्रभागातील पाथर्डी, दाढेगाव व पिंपळगाव खांब या खेड्यांचे रूपडे फारसे बदललेले नाही. शहरी व ग्रामीण भागामुळे असलेल्या समस्या मार्गी लावण्याचे प्रमुख आव्हान लोकप्रतिनिधींसमोर राहणार आहे. गाव व कॉलनी असा प्रभाग आहे. गावातील मतदान हे कॉलनी भागापेक्षा कमी आहे. मात्र, गावातून इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रत्येक पक्षाकडून पाच ते सहा उमेदवार निवडणूक लढण्यास तयार आहेत की, जे गावातील आहे. कॉलनी भागातील इच्छुकदेखील जोरदार तयारीत आहेत. कॉलनी भागात जास्त मतदान असल्याने कॉलनी भागात इच्छुकांना जास्त लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. प्रभागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थात कसमादे आणि खानदेशी मतदारांवर उमेदवारांची भिस्त राहणार आहे. गावातील शंभर टक्के मतदान करून घेणे तसे सोपे असते. मात्र, कॉलनी भागातील मतदार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेरगावी जातात किंवा मतदान करण्यासाठी बाहेर पडत नाहीत. त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असते.
पाथर्डी भागात एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा दुसर्यांदा निवडून येत नाही, असे अद्यापपर्यंतचे चित्र आहे.प्रत्येक वेळी नवीन नगरसेवक देण्याची परंपरा जपली आहे. त्यामुळे यंदा ही परंपरा जपली जाते की इतिहास बदलेल, हे बघणे रंजक ठरणार आहे. ही प्रथा मोडून काढण्यासाठी प्रस्थापित उमेदवारांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तसेच नवीन इच्छुक उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतील. शिंदे गटाच्या वतीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहे. आरक्षण जाहीर होण्याच्या अगोदरच त्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम, गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. भाजपच्या वतीनेदेखील कार्यक्रम घेतले जात आहेत. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत कलह लपून राहिलेला नाही. मनसे व ठाकरे गटदेखील अनेक कार्यक्रमांत एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चाचपणी सुरू आहे. सर्वसाधारण गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज एकत्र फिरणारे एकमेकांसमोर उभे ठाकले तर नवल वाटणार नाही!
विद्यमान नगरसेवक

भगवान दोंदे

सुदाम डेमसे

संगीता जाधव

पुष्पा आव्हाड
प्रभागाची व्याप्ती –
हॉटेलच्या पूर्वेकडील भाग, हॉटेल सेक्स हेवन पूर्वेकडील भाग, ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर, बला-पाथर्डी रोड, गुरुगोबिंद सिंग कॉलेज मोरील भाग, पाथर्डी फाटा ते पाथर्डी गावठाणच्या पाथर्डीराच्या उत्तरेकडीलब दक्षिणेस्वील भाग, प्रशांतनगर, अयोध्या कॉलनी, नरहरीनगर, दमोदरनगर, दादासाहेब फाळके स्मारक व लालचा भाग, पाथर्डी गाव, पाथर्डी, दावेगनरेशच्या पूर्व-पश्चिम भाग, दावाय, पिंपळगाव खांब रोहव्या पश्चिमेकडील भाग
2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या: 44,960
अनु. जाती 6,136
उनु, जमाती 3,473
प्रभागातील विकास कामे –
1) पाथर्डी , दाढेगाव कॉक्रिटीकरण . पाथर्डी ते दाढेगाव सिमेंट रस्ता झाला.
2) मळे परिसरात पिण्याची पाण्याची पाइपलाइन.
3) मळे भागात नवीन वीज पोल बसून वीज पुरवठा
4) जेष्ठ नागरिकांसाठी ठीक ठिकाणी पेपर स्टँड
5)सर्वे नंबर 234 पाण्याची टाकी, प्रभागात, भुयारी गटार, ड्रेनेज लाईन टाकल्या.
,6) आमदार सीमा हिरे यांच्या निधीतून कला, क्रीडा, सांस्कृतिक सभामंडप.
7)आमदार निधीतून पाइपलाइन
8), फाळके स्मारक येथे वसतिगृह.
9) कवडेकर वाडीत गट्टूच्या माध्यमातून सुशोभीकरण,
10)मंदिर तेथे सभामंडप, खुल्या जागेत सभागृह,
11) सुसज्ज अभ्यासिका
12) चेतना नगर येथे पाण्याची टाकी.
प्रभागातील समस्या
1)रस्त्याची झालेली दुरवस्था. मुख्य रस्ते सोडता अन्य रस्ते खड्डेमय
2)जवळपास संपूर्ण प्रभागात पाण्याची समस्या. अत्यंत कमी दाबाने पाणी येते. अपरात्री पाणी येते.
3) लोड शेडिंग
4)पाथर्डी फाटा ते वडनेर पर्यंत डिव्हायडर टाकणे.
5)प्रभागातील पथदीप बंद पडले अवस्थेत आहे.
6)फाळके स्मारक ची झालेली दुरवस्था.
7) कचरा डेपो मधून वाहणारे काळपट पाणी.
8) भटक्या कुत्र्याचा उपद्रव
इच्छुक उमेदवार –
सुदाम कोंबडे, अमोल जाधव, सुदाम डेमसे,संजय नवले, मनोहर बोराडे, देवानंद बिरारी, अर्चना जाधव, विनोद (बंडू) दळवी, सोमनाथ बोराडे, वैशाली विनोद ( बंडू) दळवी, सुनील कोथमीरे, बाळकृष्ण शिरसाट, जितेंद्र चोरडिया, त्रंबक कोंबडे, संजय गायकवाड, डॉ. पुष्पा पाटील नवले, पूजा तेलंग, वसंत पाटील, प्रशांत बडगुजर, अनिल गायकवाड, ज्योती गायकवाड, रवींद्र गामने, एकनाथ नवले, सोनाली एकनाथ नवले, मदन डेमसे, माधुरी मदन डेमसे, माधुरी नवले, पुष्पा सोमनाथ बोराडे, संदेश एकमोडे, शैला दोंदे, शारदा दोंदे, अॅड. निकेतेश धाकराव, धनंजय गवळी, राणी धनंजय गवळी, प्रियांका राम बडगुजर, रत्ना महाले, अर्चना रविंद्र गामणे, अनिता ठाकूर, चेतन फेगडे, उत्तम उघाडे, , ज्ञानेश्वर महाजन , गिरीश जोशी, संदीप दोंदे, लालचंद साळुंखे, लीना साळुंखे, रोहिणी ज्ञानेश्वर महाजन, चेतन चुंबळे,चेतन कोथमिरे, किरण भुसारे, सुभाष महाले, दीपक , दीपक केदार, रोहिणी दीपक केदार, श्रुती नाईक, संदीप जगझाप, प्रगती चेतन फेगडे.
नागरिक म्हणतात…

मी गेल्या अनेक वर्षापासून आनंद नगर परिसरात राहते. आनंद नगर, गिरधर नगर पोद्दार स्कुल परिसर महानगरपालिकेलत येतो किंवा नाही असे वाटते. कारण रस्त्याचे काम होत नाही, पाणी पुरेसे मिळत नाही स्वच्छता होत नाही , पावसाळी पाणी जाण्यासाठी नियोजन नाही.
-कोमल चौधरी.
प्रशांत नगर मधील महापालिकेच्या शाळेला सर्व भौतिक सुविधा उपलब्ध नाहीत. मुलांना स्वच्छता गृहाची सोय नाही. मुरलीधर नगर परिसरात रात्री उशिरा पाणी येते. त्यातही पाण्याला कमी दाब आहे. त्यामुळे पुरेसे पाणी मिळत नाही. पावसाळ्यात टँकरने पाणी आणावे लागते.
पल्लवी जाधव, महिला नागरिक.
परिसरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत. शिवाय पावसाळ्यात याच खड्ड्यात पाणी साचते. त्यामुळे दुचाकीस्वारांचा अपघात होतो. उद्यानाची अवस्था अगदीच बिकट आहे.
निखिल लभडे, युवक
मळे भागात जाण्यासाठी योग्य रस्ते नाहीत. नव वसाहतींना अनेक नागरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वेळेवर घंटागाडी येत नाही. त्यामुळे ठीक ठिकाणी कचर्याचे ढीग साचले आहेत. मोकळे मैदानामध्ये गाजर गवत वाढलेलं आहे. कचरा डेपोतून वाहून येणार्या पाण्यामुळे विहिरींचे पाणी दूषित झाले आहे.
समाधान वलवे , शेतकरी


