तापमान 10.1 अंशांपर्यंत घसरले
नाशिक : प्रतिनिधी
गेल्या आठवड्या पासून शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. यंदा तापमानात प्रथमच इतकी घसरण झाली आहे.थंडी वाढल्याने नाशिककर गारठले आहेत. काही दिवस तापमान कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तापमान कमी झाल्याने सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी पडत आहे.
दरवर्षीच नाशिकमधील कडाक्याची थंडी राज्यभर चर्चेचा विषय ठरते. शहरातील पारा काही दिवसांपासून चांगलाच घसरला आहे. कडाक्याच्या थंडीची नाशिककर आतुरतेने वाट पाहत असतात. थंडीचा जोर वाढल्याने स्वेटर, मफलर, कानटोप्या यांच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे. रविवार (दि.16)चे शहरातील किमान तापमान 10.1 इतके, तर कमाल तापमान 27.7 नोंदवले गेले. यंदा थंडीचा कडाका दरवर्षीइतका जाणवला नाही. मात्र, आता थंडी वाढल्याने डिसेंबर-जानेवारीत पारा आणखी घसरण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. थंडीत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
नागरिक कडाक्याच्या थंडीचा आनंद घेत आहेत. थंडी वाढल्याने सकाळच्या वेळी जॉगिंग ट्रॅकवर जॉगिंगसाठी येणार्या नागरिकांची गर्दी वाढली आहे. कडाक्याच्या थंडीचा आनंद घेत गरम चहाचा आस्वाद घेताना नागरिक दिसत आहेत. थंडी वाढल्याने रात्री आणि सकाळी विविध ठिकाणी शेकाट्यांभोवती गप्पांचे फड रंगताना दिसत आहेत.
तापमानात झालेली घट किमान कमाल
16 नोव्हेंबर 10.1 27.7
15 नोव्हेंबर 10.3 27.9
14 नोव्हेंबर 10.9 28.3
18 नोव्हेंबर 10.3 29.4
17 नोव्हेंबर 10.6 29.3
उबदार कपड्यांच्या किमतीत वाढ
गतवर्षापेक्षा उबदार कपड्यांच्या किमतीत 5 ते 10 टक्के वाढ झाल्याचे समजते. वूलन स्वेटर, मफलर, शाल यांच्या किमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. लहान मुलांच्या स्वेटरमध्ये साइजनुसार 10 टक्के वाढ झाल्याचे दिसलेे.