सिन्नर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी अंतर्गत स्पर्धा शिगेला

इच्छुकांच्या शर्यतीने वाजे-कोकाटेंची डोकेदुखी वाढली; आज ठरणार अंतिम उमेदवार

सिन्नर : भरत घोटेकर सिन्नर नगरपालिका
निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी आज, सोमवारी (दि.17) अंतिम दिवस आहे. रविवारी (दि.16) क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव अंतिम झाले नव्हते. दोन्ही गटांकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी अंतर्गत मोठ्या प्रमाणात स्पर्धा असल्यामुळे नेमकी कुणाचे नाव अंतिम होणार आणि कुणाचा पत्ता कट होणार, याचा फैसला आज (दि. 17) होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे यांना नगराध्यक्षपदासाठी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे समजताच माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. शिवाय जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र चव्हाणके, कृष्णा कासार, हर्षद देशमुख यांनीही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे. विठ्ठल उगले यांना चुचकारण्याचा प्रयत्न वाजे गटाकडून झाल्याची चर्चा झडल्याने अध्यक्षपदाचे उमेदवाराचे नाव जाहीर करण्यासाठी कोकाटे गटाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. त्यातच विठ्ठल उगले यांच्या ’आता माघार नाही’, अशा पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या चर्चेला बळकटी मिळाली आहे. हर्षद देशमुख यांनी अध्यक्षपदासाठी आपणच खरे दावेदार असून, उमेदवारी मिळावी यासाठी हट्ट धरत कोकाटेंचे टेन्शन वाढवले आहे. शिवसेना गटाकडून डॉ. संदीप मोरे उमेदवारीसाठी आग्रही होते. मात्र, आता त्यांचे नाव मागे पडले असून, पंकज मोरे उमेदवार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यातच रविवारी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत आपल्या पत्नीचा सदस्यपदासाठी अर्ज दाखल करत आपली ताकद दाखवून दिली आहे. दुसरीकडे, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांच्या नावाची नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी पुन्हा चर्चा झडू लागली आहे. समोरचा उमेदवार जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपलाही उमेदवार जाहीर करायचा नाही, अशी भूमिका खासदार वाजे यांनी घेतल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *