सखा माझा ज्ञानेश्वर…

उत्पत्ति एकादशी अर्थात, श्रीक्षेत्र आळंदी यात्रा पार पडली. आता कार्तिक वद्य त्रयोदशीला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 729 संजीवन समाधी उत्सव पार पडत आहे. आळंदी क्षेत्री वारकरी मंडळींनी मनोभावे दर्शन घेतले. इ. स. 1296 अर्थात कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 ला आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधिस्त झाले. ’ज्ञानदेवें रचिला पाया’ वारकरी संप्रदायाचा पाया हा संत ज्ञानेश्वरांनी घातला, तो संप्रदाय पुढे महाराष्ट्राची लोकसंस्कृती ठरला. संत ज्ञानेश्वरांना कुणी माउलीच्या, कुणी सखा, तर कुणी ज्ञानाचा सागर रूपात पाहिले.
ज्ञानराज माझी योग्यांची माउली। जेणे निगमवल्ली प्रगट केली ॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी। ब्रह्मानंदलहरी प्रगट केली ॥
अध्यात्म विद्येचें दाविलेंसें रूप। चैतन्याचा दीप उजळिला ॥
छपन्न भाषेचा केलासे गौरव। भवार्नवीं नाव उभारिली ॥
श्रवणाचे मिषें बैसावें येउनी। सामराज्य भुवनीं सुखी नांदे ॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। एकतरी ओवी अनुभवावी ॥
संत नामदेव महाराज संत ज्ञानेश्वरांचे वर्णन योगियांची माउली अर्थात माता म्हणून गौरव करतात. ज्ञानराज संबोधन करत गुरूंचे स्थान देतात. वेदांची व संस्कृत भाषा प्राकृतमध्ये देऊन ज्ञानेश्वरी नावाची गीता अलंकारित केली. समाजाला समजेल अशा भाषेत ती मांडली. त्यामुळे समाज ज्ञान प्राप्त करू लागला. यातून एक ब्रह्म आनंदाची लहर प्रकट झाली. ज्ञानेश्वरी श्रवण व अभ्यासावी या ज्ञानात समरस झाल्याने आनंद प्राप्त होईल. यामुळे आध्यात्मिक ज्ञान सर्वसामान्यांना मिळू लागले. चैतन्याचा दीप अर्थात, ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरला. संत नामदेव महाराज म्हणतात. ज्ञानदेवी अर्थात, ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीत मानवी जीवनातील मर्म स्पष्ट करते. ज्ञानाचा मार्ग दाखवते. अंधश्रद्धेतून बाहेर काढून सत्मार्ग दाखवते. यासाठी प्रत्येकाने एकतरी ओव्या अनुभवावी, असे संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी ग्रंथाबाबत अभंगातून सांगतात.
सखा माझा ज्ञानेश्वर।
विष्णूचा अवतार ॥
जा चला अलंकापुरा।
संतजनांच्या माहेरा ॥
इंद्रायणीकाठी स्नान।
मुक्ति लाभते चरणी ॥
ज्ञानेश्वरांच्या चरणी।
सेना आली लोटांगणी ॥
संत सेना महाराज आपल्या अभंगातून स्तुती करताना संत ज्ञानेश्वर महाराजांंना सखा अर्थात, मित्र मानतात. सेना महाराज माउलींना ते विष्णू रूपात पाहतात. अलंकापुरी अर्थात, आळंदी क्षेत्र होय. आळंदीस ते संतांचे माहेर आहे. त्याठिकाणी जाऊन इंद्रायणी नदीत स्नान केल्याने मुक्ती लाभते. त्याच इंद्रायणीकाठी असलेल्या माउलींच्या चरणस्पर्शाने मुक्ती मिळते. त्यामुळे मीही लीन होत नतमस्तक झालो आहे. संत सेना महाराज आपल्या अभंगवाणीतून संतांच्या कार्याचे दर्शन घडवतात.
संत जनाबाईंनी आपल्या अभंगातून संत ज्ञानेश्वरांचे वर्णन हे ज्ञानाचा सागर, असे करतात. खरोखरच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृत भाषेतून जनसामान्यांना समजेल अशा प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायांतून माहात्म्य व विश्वकल्याण साधिले आहे.
संत जनाबाईं म्हणतात, ज्ञानदेवाने माझ्या पोटी जन्मा यावे. माउलींना माझ्या भावा सखा म्हणजे मित्र म्हणून विनवतात, की जेणेकरून जीव ओवाळून टाकावा. जन्मोजन्मीचे दास व्हावे, असे संत जनाबाई भाव व्यक्त करतात.
कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर। तया नमस्कार वारंवार॥
न पाहे यातीकुळांचा विचार।
भक्त करुणाकर ज्ञानाबाई ॥
भलतिया भावें शरण जातां भेटी। पाडितसे तुटी जन्मव्याधी॥
ज्ञानाबाई माझी अनाथाची माय। एका जनार्दनीं पाय वंदितसे॥
माउली कधी आपल्या लेकरांमध्ये भेदभाव करत नाही, तसे संत आणि भक्त कोणत्या जातीचा कुळाचा आहेस याचा विचार करत नाहीत. ते करुणाकर असे ज्ञानाबाई अर्थात, आई आहेत. त्यांना शरण गेल्याने, श्रवण केल्याने जन्मव्याधी नाहीशी होते. वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानेश्वरांना पाया मानतात. प्राकृत भाषेत गीता ज्ञान देऊन त्यांनी सर्वांना ज्ञानाचा अधिकार दिला. माय, माउली, सखा, ज्ञानाचा सागर, अशा उपमा दिल्या आहेत. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वकल्याण व विश्वशांतीचा जगात बाराव्या शतकात प्रथम संकल्प मांडला. माउलींनी मागितलेले पसायदान हे जगाला दिलेली संत साहित्याची सर्वांत मोठी देणगी आहे.
जे खळांची व्यंकटी सांडो।
तयां सत्कर्मी रती वाढो॥
भूतां परस्परें पंडो। मैत्र जीवाचें।
दुरिताचे तिमिर जावो।
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो॥
जो जे वांछील तो ते लाहो।
प्राणिजात॥
संत ज्ञानेश्वर महाराज पसायदानातून जगाच्या कल्याणाची महती मांडतात. ते म्हणतात, जे खल, दुष्ट, दुर्जन आहेत. दुष्टपण नष्ट व्हावे. त्यांना सत्कर्म लाभो. शत्रुत्व संपून मैत्री निर्माण व्हावी. दुरित म्हणजे पाप, अंधार, अज्ञान नाहीसे होऊन सर्व विश्वात स्वधर्मरूप सूर्याच्या प्रकाशात आपण जेव्हा बघाल, तेव्हा ज्या प्राण्यांना हे काही आवश्यक असेल तर सर्व काही मिळेल. पसायदान त्यांनी विश्वाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाकडे मागणे मागितले आहे.
ज्ञानदेवे घेतले दान।
हृदयी धरुनिया ध्यान॥
समाधी बैसला निर्वाण।
कथा कीर्तन करीतु॥
संत ज्ञानेश्वर माउली वयाच्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधिस्त झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *