मूलभूत समस्यांचे ग्रहण सोडविण्याचे आव्हान

लक्ष्यवेध : प्रभाग-8

उच्चभ्रू वसाहतीपासून तर झोपडपट्टी अशी संमिश्र वस्ती, अशी प्रभाग 8 ची ओळख आहे. गंगापूर रोड व कॅनॉल रोडचा परिसर गेल्या काही वर्षांत कमालीचा विकसित होत आहे. मोठमोठे टॉवर उभे राहत असले, तरी सामान्य नागरिकांना भेडसावणारे अनेक प्रश्न आजही जैसे थे आहेत. रस्त्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे आणि हॉटेल्सची थेट रस्त्याच्या कडेला असणारे पार्किंग, कॅनॉल रोडची झालेली दैना यांसारख्या समस्यांचे ग्रहण या प्रभागाला लागले आहे.
पाइपलाइन रोडलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत आहे. या भागातील उद्यानांत मद्यपींचा अड्डा तयार होत आहे. कॅनॉललगत असलेल्या झाडांच्या खाली दुपारच्या वेळी अनेक टवाळखोर ठाण मांडून बसलेले असतात. कॅनॉल रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. मध्यंतरी या भागातील नागरिकांनी थेट रस्त्यावर येत रास्ता रोको आंदोलनही केले होते. याशिवाय या भागातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. सुसज्ज वाचनालय, अभ्यासिका, उद्यान नाही. मोठ्या प्रकल्पांकडे लक्ष देताना लहानलहान समस्यादेखील सोडविणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
गंगापूर रोड आणि सातपूर गाव यामधील वसाहतींचा फारसा विकास झालेला नाही. यात पाइपलाइन रोड, गणेशनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, बळवंतनगर, काळेनगर, सोमेश्वर कॉलनी, ध्रुवनगर, सम्राट ट्रोपीकानो सोसायटी, सिरीन मेडोज यांसारख्या वसाहती दुर्लक्षित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या भागातील लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी सर्व सुविधांयुक्त असे एकही उद्यान नाही. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी सुसज्ज अशी अभ्यासिका नाही. वाचनालय नाही. युवकांसाठी क्रीडांगण नाही. खरेतर या समस्या सोडविणे अत्यंत गरजेचे आहे.
गंगापूर रोडचे काम झाले आहे. त्या भागातील रस्त्यांची कामे झालेली आहेत. परंतु गणेशनगर, सदगुरूनगर, खांदवेनगर, बळवंतनगर, काळेनगर, सोमेश्वर कॉलनी, ध्रुवनगर, संत कबीरनगर भागातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. सदगुरुनगरातील उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. उद्यानात हिरवळ नावालाच उरलेली आहे. खेळणी मोडकळीला आलेली आहेत. या उद्यानात टवाळखोरांचा आणि मद्यपींचा सतत वावर असतो. पाण्याच्या गळतीमुळे दलदल झाली आहे. कॅनॉललगत बळवंतनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ अतिक्रमण वाढत चालले आहे.
कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीत मिसळते. त्यामुळे नदी प्रदूषण होत आहे. हे सांडपाणी बंद करण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली पाहिजे, अशीही मागणी करण्यात येत आहे.
पाइपलाइन रोडवरील सदगुरूनगर परिसरातील अरुंद पूल वाहतुकीला धोकादायक झाला आहे. पुलावरून वाहने खाली पडून अपघात घडले आहेत. वाहनधारक गंभीर जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पुलाला समांतर पूल तयार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. सदगुरूनगरचा भाग विकसित होत असल्याने रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक मोठ्या रहिवासी इमारती, शाळा, महाविद्यालये या भागांत विकसित होत आहेत. या मार्गानेच नवश्या गणपती, सोमेश्वर मंदिर, गंगापूर धबधबा या स्थळांकडे जाणार्‍यांचीही गर्दी असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होत आहे. आनंदवली येथील स्कायवॉकचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यास होणारे अपघात टळतील आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल, असेही नागरिकांचे म्हणणे आहे.
कॅनॉल रस्त्यालगत मोठमोठ्या सोसायट्यांची कामे सुरू आहेत. तेथील मलबा, घनकचरा, रॉ मटेरिअल रस्त्याच्या कडेला, मोकळ्या मैदानात टाकण्यात येत असल्याने डंपिंग ग्राउंड तयार होत आहे. कचर्‍याचे ढीग साचलेले आहेत. गंगापूर रोड, सिरीन मेडोज, काळेनगर, नवश्या गणपती परिसर या भागात बहुतांश उद्योजक, व्यावसायिक, उच्चभ्रू लोकांची निवासस्थाने आहेत. जवळच सातपूर औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे पाइपलाइन रोड मॉडेल रोड म्हणून विकसित करण्याची गरज आहे.

विद्यमान नगरसेवक

                                                                  विलास शिंदे

                                                              संतोष गायकवाड

                                                                नयना गांगुर्डे

                                                             स्व. राधा बेंडकुळे

 

प्रभागातील समस्या

• रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे.
• उद्यानांची दुरवस्था.
• वाचनालये, अभ्यासिकेची वानवा.
• अनियमित घंटागाडी.
• मोकळे मैदान बनले डम्पिंग ग्राउंड.
• रस्त्याचे रखडलेले रुंदीकरण.
• बारदान फाट्यापर्यंत दुभाजकाची गरज.
• पथदीपांअभावी अंधाराचे साम्राज्य.

राजकीय स्थिती

प्रभाग 8 मध्ये मागील वेळी विलास शिंदे, राधा बेंडकुळी, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे हे निवडून आले. त्यातील राधा बेंडकुळी यांचे निधन झाले. त्यामुळे सध्या विद्यमान तीन नगरसेवक आहेत. त्यात गेल्या दोन वर्षांत अनेक घडामोडी घडल्या. विलास शिंदे शिवसेना ठाकरे गट सोडून शिंदे गटात गेले. संतोष गायकवाड हेदेखील सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. त्यामुळे येथे उबाठाकडून अनेक जण इच्छुक असले, तरी निवडून येण्यासाठी त्यांचा चांगलाच कस लागणार आहे. येथे उबाठाला मोठे खिंडार पडले. मागील वेळी चारही जागा उबाठाच्या निवडून आल्या होत्या. यावेळची परिस्थिती बदलली आहे. उबाठाचे सर्व विद्यमान शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे उबाठाची मदार नव्या फळीवर आहे. याशिवाय भाजपाकडून इच्छुक असणार्‍यांची लांबलचक यादी आहे.
भाजपाने शंभर प्लसचा नारा दिल्याने भाजपाकडील इच्छुकांची यादी लांबतच चालली आहे. आ. सीमा हिरे यांच्या कन्या या नेमक्या कोणत्या प्रभागातून रिंगणात उतरतात याबाबतही अजून निश्चिती नाही. शिंदे गटाचे विशेषत: विलास शिंदे यांचे वर्चस्व असले, तरी भाजपानेही चांगलाच जोर लावला आहे. वाढलेल्या इच्छुकांची संख्या पाहता तिकिटासाठी येथे घमासान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इच्छुक उमेदवार

विलास शिंदे, संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, किरण जाधव, सागर कोथमिरे. भाजपाकडून आमदार सीमा हिरे यांच्या कन्या रश्मी हिरे- बेंडाळे, माजी नगरसेविका स्व. राधा बेंडकुळे यांच्या जाऊबाई उषा बेंडकुळे, शरद काळे, अशोक जाधव, जयश्री काळे, प्रमिला जाधव, रोहिणी नायडू, वर्षा जाधव, दशरथ लोखंडे, प्रवीण अहिरे, रूपाली अहिरे, अमित कोथमिरे, अर्चना कोथमिरे, हिरामण बेंडकुळे, राजश्री नामपूरकर, प्रवीण पाटील, चेतन बेंडकुळे, रेखा बेंडकुळे, कविता गायकवाड, नयना गांगुर्डे, कैलास जाधव, विष्णुपंत बेंडकुळे.

अनियमित पाणीपुरवठा


नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रमुख नागरी समस्या म्हणजे पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित बाबी, या आहेत.
नाशिक महापालिका शहराच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पुरवठा करण्यासाठी नवीन
जलवाहिनी व पाइपलाइन नेटवर्क विकसित करत आहे, पण काही प्रभागांत नियमित आणि शुद्ध पाणी मिळण्याची समस्या आजही कायम आहे. रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक, अंतर्गत रस्ते, दुरुस्ती आणि डांबरीकरण हे मुद्दे वारंवार नागरिकांच्या तक्रारींमध्ये आढळतात. वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे आणि अपूर्ण सडक प्रकल्प यामुळे नागरिकांना दैनंदिन त्रास सहन करावा लागतो.स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कचर्‍याची नियमित उचल, स्वच्छता कर्मचारी उपस्थिती आणि कचरा डेपोचा अभाव या प्रभाग 8 मधील समस्या आहेत. अनेक वेळा कचरा जास्त दिवस पडून राहतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व विविध रोगांचा प्रसार होतो. सार्वजनिक आरोग्य आणि नाली व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचणे आणि नाल्यांची तुंबलेली स्थिती ही नागरिकांची मोठी समस्या आहे. – जयश्री काळे, समाजसेविका, इच्छुक उमेदवार

रस्ता रुंद नसल्याने अपघात
पाइपलाइन रोडचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे. पाइपलाइन रोडलाच सायकल ट्रॅकही विकसित होणे आवश्यक आहे. प्रभागामध्ये सीसीटीव्हीचा अभाव दिसून येतो. त्यामुळे ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे. प्रभागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. त्यामुळे पोलिस गस्त वाढवावी. पाइपलाइन रस्ता हा एमआयडीसी रस्त्याला जोडला गेलेला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यासाठी दुभाजक बसविणे गरजेचे बनले आहे.
– किरण निगळ

सुशोभीकरणाची गरज
प्रभागातील अरिहंत नर्सिंग होम ते आकाशवाणी परिसर, अयोध्या कॉलनी या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. सावरकरनगरमधील जेवढे ओपन स्पेस आहेत त्यांची नीट देखभाल करणे, सुशोभीकरण करण्याची गरज आहे. सावरकरनगर ते आनंदवली परिसरात विजेची समस्या कायम आहे. प्रभागात नदीकिनारी असलेला परिसर चौपाटीसारखा करणे गरजेचे आहे.
– सागर कोथमिरे, गंगापूर रोड

पाण्याची समस्या   

आनंदवली परिसरामधील गोदावरी हाइट्स, शंकरनगर, सोमेश्वर कॉलनी, खांदवेनगर, सदगुरूनगर या भागांत पाण्याची समस्या कायम आहे. आनंदवली परिसरातील असलेल्या अमरधामची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. संत कबीरनगर ते काठेनगर परिसरात पथदीपांचे प्रमाण अतिशय कमी आहे. जे आहेत त्यातील बरेचसे दिवे बंद आहेत.
– किरण जाधव, गंगापूर रोड

दुभाजकांची गरज

प्रभाग क्रमांक 8 मधील वाढत्या इमारती व लोकसंख्येच्या तुलनेत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. प्रभागात नियमितपणे साफसफाई होत नाही. प्रभागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. त्याचा परिणाम अपघातांवर होत आहे. या भागात सातत्याने
छोटे-मोठे अपघात होत असतात. त्यामुळे या भागातील रस्त्यांवर दुभाजक बसविण्याची गरज आहे.
– स्वप्नील घुमरे, गंगापूर रोड

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *