सध्याच्या निवडणूक वातावरणात उमेदवारांच्या परस्पर विरोधातील चित्रफिती, खोटे संभाषण, विकृत केलेली ध्वनिमुद्रणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेने बदललेली दृश्यसामग्री मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. ही गोष्ट केवळ मनोरंजनाची नाही, तर लोकशाही व्यवस्थेला आतून खिळखिळे करण्यास सिद्ध झालेला गंभीर धोका आहे.
थोडा विचार केला तर ही प्रवृत्ती समाजाला किती खोलवर हानी पोहोचवू शकते, हे स्पष्टपणे जाणवते. आजच्या काळात, गुगल जेमिनी, चॅटजीपीटी, मीडजर्नी यांसारखी प्रगत एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) साधने ही मानवाच्या ज्ञानाची आणि तांत्रिक प्रगतीची मोठी देणगी आहेत. काही वर्षांपूर्वी जिथे व्हिडीओ एडिटिंग, आवाज बदलणे, व्यक्तींची प्रतिमा तयार करणे हा कौशल्यपूर्ण आणि वेळखाऊ प्रकार होता, तिथे आज काही सेकंदात कोणाचाही फोटो, व्हिडीओ, आवाज, आणि संभाषण तयार करणे सहज शक्य झाले आहे.
1) बनावट चित्रफितीमुळे लोकमत भ्रमित होत आहे. आधुनिक पिढी विशेषतः तरुण मतदार, सामाजिक माध्यमांवर दिसणार्या गोष्टींवर तत्काळ विश्वास ठेवतात. एक खोटी चित्रफीत, कोणत्या तरी उमेदवाराचा चुकीचा संदर्भ देणारा लघू व्हिडीओ, अथवा कृत्रिम बुद्धिमत्तेने बदललेला संवाद, हे सर्व लोकांच्या राजकीय निर्णयांवर थेट परिणाम घडवतात. पूर्वी लोकमत बदलवण्यासाठी महिनोन् महिने प्रत्यक्ष प्रचार करावा लागे. आज एकच खोटी चित्रफीत काही क्षणांत संपूर्ण शहराचा विचार बदलवू शकते.
2) पूर्वीच्या राजकारणात मतभेद होते, पण वैमनस्य नव्हते. प्रचारात टीका असते, ती लोकशाहीची खूण आहे. परंतु पूर्वीच्या राजकीय संस्कृतीत सदविचारांचे नेतृत्व आणि मर्यादांचे भान मोठ्या प्रमाणात दिसत असे. राजकारणासोबत समाजकारणाला तितकेच महत्त्व असायचे. त्या काळात विरोधकांवर टीका केली जायची, पण खोटे पुरावे तयार केले जात नसत. नेत्यांमध्ये मतभेद असत, पण कटुता किंवा मतभंग नव्हता. त्यांच्या भाषणात धार असे, पण वैयक्तिक अपमान केला जात नसे. टीका वैचारिक पातळीवर होत असे; व्यक्तीवर नव्हे. अण्णासाहेब पटवर्धन, नाथ पै, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शरद पवार, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अशी नेतृत्वाची परंपरा होती. त्यांच्यातसुद्धा वादविवाद होत, मतविवाद असत, पण त्यांच्या भाषणात शब्दांची पातळी, नैतिकता आणि सौजन्य कायम राखले जात असे. आजची पिढी त्या काळातील राजकीय शुचितेचे वातावरण कधीच अनुभवत नाही.
3) तंत्रज्ञानाने नवी पद्धत समाजाला दिली आहे, पण त्याचा चुकीचा वापर होत आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांमुळे… कोणाचाही आवाज हुबेहूब उतरवणे. चेहरा बदलून खोटी चित्रफीत तयार करणे. खोटे संभाषण तयार करणे. निरपराध व्यक्तीला चुकीच्या प्रकारे गुन्हेगार दाखवणे. हे सर्व अत्यंत सहज शक्य झाले आहे. परिणामी सत्य आणि असत्य यातील भेद समाजात धूसर होत चालला आहे. आज सोशल मीडियावर अशा बनावट चित्रफिती विनोद म्हणून वापरल्या जातात. उद्या त्याच चित्रफिती एखाद्या उमेदवाराचे भविष्य, प्रतिष्ठा, कारकीर्द व कुटुंब उद्ध्वस्त करू शकतात.
4) समाजात वाढणारी दुही : या बनावट चित्रफितींच्या प्रसारामुळे… समर्थक गटांमध्ये वाद आणि तणाव. शहरांमध्ये मतभेदाचे वातावरण. कार्यकर्त्यांत अविश्वास. समाजात अनावश्यक विभाजन. यांसारखी स्थिती निर्माण होत आहे. काही वेळा जे सत्य नाही, तेच लोक सत्य मानतात. जे घडलेले नाही, ते घडल्यासारखे समजले जाते. ही प्रवृत्ती अत्यंत धोकादायक आहे.
5) नव्या पिढीसमोर जाणारा चुकीचा संदेश…
शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुणवर्ग हे सर्व पाहत आहेत की, मोठी माणसे, नेते, पक्ष, कार्यकर्ते, हे सर्व परस्परांना हरवण्यासाठी खोट्या चित्रफितींचा वापर करतात. मग स्वाभाविकच प्रश्न उभा राहतो : नव्या पिढीला आपण कोणते संस्कार देतो आहोत? खोटे रचून दुसर्याला हरवणे, हीच का राजकारणाची नवी भाषा? ही प्रवृत्ती भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.
6) उपाय ः सरकारी आणि तांत्रिक पडताळणी यंत्रणा मजबूत करणे. बनावट चित्रफिती शोधण्यासाठी विशेष प्राधिकरण तयार करणे. निवडणूक आयोगाने कठोर नियम आणणे. खोटी सामग्री प्रसारित करणार्यावर कठोर दंड करणे. शाळा व महाविद्यालयात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत नैतिक शिक्षण देणे. सामाजिक माध्यमांवर कडक पडताळणी लागू करणे. नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही दृश्य सामग्रीवर त्वरित विश्वास न ठेवणे. आज प्रत्येक चित्रफीत खरी असते. हा निष्काळजी विश्वास अतिशय धोकादायक ठरू शकतो. भूतकाळातील राजकारणात मतभेद असले तरी नैतिक मर्यादा पाळल्या जात असत. आज तंत्रज्ञानाने हातात जबरदस्त शक्ती दिली आहे, पण जबाबदारी दिली नाही. म्हणूनच कठोर कायदे, सामाजिक जागरूकता आणि प्रामाणिक नेतृत्व ही काळाची आवश्यकता आहे.
तंत्रज्ञान उत्तम आहे; परंतु त्याचा वापर माणूस जर माणसालाच हरवण्यासाठी करू लागला, तर हा विकास नसून विनाशाची पायरी ठरू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग सत्य समोर आणण्यासाठी झाला, तर तो विकास आहे. मात्र, त्याचाच उपयोग फसवणूक, बदनामी आणि वैमनस्य निर्माण करण्यासाठी झाला, तर तो लोकशाहीला आतून पोखरणारा दीमक ठरेल.