थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार

दिंडोरी : प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या थंडीने अधिकच जोर धरल्याने वातावरणात गारवा वाढला आहे. गावोगावी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार ग्रामस्थ घेत असल्याचे चित्र आहे. या शेकोट्यांभोवती निवडणुकीबाबत गप्पांचा फड रंगत आहे. इच्छुक उमेदवारांनी गावोगाव भेटीगाठी सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या वातावरणात गारवा पसरत असल्याने पहाटे व रात्री थंडीने हुडहुडी भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गावागावांत शेकोट्या दिसून येत आहेत. थंडी वाढल्याने उबदार कपडे वापरण्याकडे कल वाढला आहे. काहींनी ठेवणीतील जुने स्वेटर, मफलर, कानटोपी, शाल आदी उबदार कपडे बाहेर काढले आहेत.
थंडीचा जोर वाढल्यामुळे ग्रामीण भागात ब्लँकेट, सोलापुरी चादरी, रजई व शाल यांसारखे उबदार कपडे विक्रीसाठी राजस्थान, गुजरात व इतर राज्यांतून विक्रेते येत आहेत.
कडाक्याच्या थंडीत शेकोटीची ऊब घेत मित्रांच्या आपल्या उमेदवाराचे राजकीय समीकरण व त्याच्या विश्लेषणाचे मुद्दे गप्पांमध्ये रंगताना दिसत आहेत. थंडीचा ऋतू आरोग्यासाठी लाभदायी मानला जातो. हिवाळ्यात शरीराला नैसर्गिक शक्ती मिळत असते. त्यामुळे हिवाळ्यात भूक चांगली लागते. त्यासोबत पचनक्रियादेखील सुधारते. यामुळे हा ऋतू आरोग्यदायी मानला जातो. आहारासोबत व्यायामावरदेखील नागरिक भर देतात. यामुळे सकाळ-संध्याकाळ फेरफटका मारणार्‍यांची संख्याही वाढली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *