महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसला द्रुतगती महामार्गांवर टोलमाफी

मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष प्रयत्न

नाशिक: प्रतिनिधी
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठ-पुराव्याला यश आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसेसला राज्यातील द्रुतगती महामार्गांवर 100 टक्के टोलमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाशिक-मुंबई ई-शिवाई बस आता समृद्धी महामार्गावरून धावणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी दि. 3 ऑगस्ट 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याबाबत मागणी केली होती. दि. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2030 या कालावधीसाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-2025 जाहीर करण्यात आले आहे.
याअंतर्गत उपरोक्त मार्गांवरील खासगी, सरकारी व निमसरकारी अशा सर्व ई-वाहनांना टोलमाफीचादेखील निर्णय झाला होता. एसटीच्या ई-बसेसनादेखील ही टोलमाफी लागू करण्यात आली होती.
परंतु याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले नसल्याने द्रुतगती महामार्गांवर या टोलमाफीची अंमलबजावणी होत नव्हती.
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी परिपत्रक काढण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राज्य शासनाकडून दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले. नुकतीच या निर्णयाची अंमलबजावणीदेखील सुरू करण्यात आली आहे. याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे मनापासून आभार मानले आहेत. या अंमलबजावणीमुळे मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, मुंबई-शिर्डी, तसेच मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा-शेवा अटल सेतूवरून प्रवास करणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या ई-बसेसना टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे आता प्रवासाचा वेळ एक तासाने घटणार आहे. अवघ्या साडेतीन तासांत मुंबई ते नाशिक हे अंतर पार करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *