भारतनगरमध्ये अल्पवयीन मुलाकडून महिलेवर बळजबरीचा प्रयत्न

वडाळा गाव : प्रतिनिधी

नाशिकच्या भारत नगर परिसरात काल दुपारी एका अल्पवयीन मुलाने एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या झटापटीत आरोपी घसरून पडला. त्यानंतर त्याने महिलेच्या लहान मुलीलाही छेडण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या गंभीर घटनेची तक्रार महिलेने तत्काळ मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्यात या अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

घटनेनंतर पोलीस ठाण्यात तणाव

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमा झाले होते. नागरिकांची वाढती गर्दी पाहून पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांमध्ये अल्पवयीन मुलाच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने धाव

परिसरातील तणाव लक्षात घेता, घटनास्थळ आणि पोलीस ठाण्यात परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सुधाकर सुरडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, संतोष नरुटे, मधुकर कड, गजेंद्र पाटील यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने पोहोचले. शीघ्र कृती दल आणि इतर विशेष पथकांना बोलावून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. महिलेवर बळजबरीचा प्रयत्न केल्याच्या या घटनेमुळे पोलिसांनी तातडीने पाऊले उचलली.

अफवांना थारा नको

दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे. “लहान मुलीच्या बाबतीत अत्याचार झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, असा कुठलाही प्रकार झालेला नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अल्पवयीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत. अल्पवयीन मुलाने केलेल्या महिलेवर बळजबरीचा प्रयत्न या गुन्ह्यामुळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *