अंतर्गत रस्त्यांची दैना, प्रभावी कामांकडे कुणीच लक्ष देईना!

लक्ष्यवेध : प्रभाग-10

विद्यमानांपुढे आव्हाने, इच्छुकांच्या संख्येत वाढ

सातपूरच्या प्रभाग 10 मध्ये अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे फक्त काही ठराविक भागातच झाली आहेत. इतर भागांतील रस्त्यांकडे गेल्या पाच वर्षांत नगरसेवकांनी लक्षच दिलेले नाही. ठराविक भागांतील रस्ते एकदम चकाचक आणि सावरकरनगर, आनंद-छाया, जाधव संकुल या भागांतील रस्त्यांची पुरती दैना झाली आहे. अशी सारी परिस्थिती आहे. त्यामुळे किमान नागरी सुविधांसाठी सहजरीत्या उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी निवडण्याच्या मानसिकतेत या प्रभागातील नागरिक दिसत आहेत.
प्रभागातील मुख्य रस्त्यांची कामे झाली असली, तरी काही ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची कामे गेल्या पाच वर्षांत झालीच नाहीत. आनंद-छाया या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, त्यावर नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले की, त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही.सावरकरनगर भागातील काही परिसर एकदम चकाचक झाला. विशेषत: नगरसेवकांचे निवासस्थान असलेल्या भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, सावरकरनगरमधीलच गणपती मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची पुरती वाट लागली. येथे नाला बुजवल्याने चेंबरची समस्या निर्माण झाली. या भागात पाणीही वेळेवर येत नाही. काही नगरसेवकांनी निवडून गेल्यानंतर पुन्हा या भागाकडे ढुकूंनही पाहिले नाही. विद्युततारा भूमिगत करण्याचा प्रश्न तर वर्षानुवर्षे तसाच पडून आहे. सहा हजार वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचीही दुर्दशा झाली आहे. या भागात अनेक ठिकाणी पथदीप केवळ नावालाच आहेत. रात्रीच्या वेळी ते बंदच असतात. धोकादायक विद्युततारा आणि खांबांंमुळे विजेचा धक्का लागून अनेकांचा जीव गेला आहे. नागरिकांना स्थानिक नगरसेवक, आमदार यांच्याकडे, महानगरपालिका,
महावितरण कंपनी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागत आहे.
महापालिका अस्तित्वात येऊन 33 वर्षे लोटली आहेत तरी अजून रस्ते, वीज ,पाण्यासाठी झगडावे लागत आहे. प्रभागात पिंपळगाव बहुला गावठाणचा समावेश आहे. या गावात अभ्यासिका, व्यायामशाळा, क्रीडांगण, उद्यान यांसारख्या कोणत्याही सोयीसुविधा मिळू शकल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. आता गावालगत नवीन वसाहती उदयास येत आहेत. त्या ठिकाणी तरी उद्यानासाठी भूखंड आरक्षित ठेवावा, अशी मागणी होत आहे. त्र्यंबकेश्वर रोड ते बारदान फाटा या रस्त्यावर दोन्ही बाजूने व्यावसायिक बाजारपेठ आहे. महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे प्रवेशद्वार याच ठिकाणी असल्याने दररोज असंख्य मोठी अवजड वाहने, कंटेनर ये-जा करत असल्याने सातत्याने अपघात होतात. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशोकनगर येथील कै.पंढरीनाथ नागरे भाजी मार्केटजवळ आणि मुख्य रस्त्यावर सायंकाळच्या सुमारास खूप गर्दी होत असल्याने रहदारीला अडथळा होत आहे. सातपूर-अंबड लिंकरोडवर राज्य परिवहन महामंडळाची जागा पडून आहे. याठिकाणी भव्यदिव्य असे बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते.
प्रभागात सावरकरनगरला एकमेव अभ्यासिका आहे. परंतु येथे विद्यार्थ्यांची संख्या अतिशय मर्यादित आहे. शिवाय महापालिकेची जरी ही अभ्यासिका असली, तरी व्यवस्थापनाची जबाबदारी महापालिकेने स्वत:कडे घेण्याची गरज आहे. त्यामुळे किमान अभ्यासिकेचा प्रचार आणि प्रसार होऊन त्याचा लाभ गरजू मुलांना मिळू शकेल. येथे वाचनालय सुरू केल्यास त्याचाही फायदा मिळण्यास मदत होईल. महापालिकेने येथे महिला उद्योजक केंद्र उभारले होते; परंतु ते बांधल्यापासून बंदच होते.

प्रभागातील समस्या

♦• अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था.
•♦• मोकळ्या भूखंडांवर कचर्‍यांचे ढीग.
♦• • वाचनालयाचा अभाव.
♦• • अभ्यासिका नाही.
♦• • घंटागाडी अनियमित.
•♦• उद्यानांची दुर्दशा.
♦• • ज्येष्ठांसाठी पार्क नाही.
•♦• टवाळखोरांचा उपद्रव.
♦• • ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग.
♦• • अंतर्गत रस्त्यांवर पथदीपांअभावी अंधार.
♦• • धोकादायक विद्युततारा भूमिगत नाहीत.
♦• • प्रभागातील उद्यानाची दुरवस्था.
♦• • अंतर्गत रस्ते डांबरीकरण झालेले नाहीत.
•♦• प्रभागात डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया याचा वाढता प्रादुर्भाव.
•♦• रस्त्यावरील अनधिकृत व्यवसायिकांचे अतिक्रमण.

प्रभागाची व्याप्ती

सावरकरनगर, विनायक संकुल, अंबड लिंक रोड, नागरे मळा, अशोकनगर, राज्य कर्मचारी वसाहत, भंदुरे मळा, समतानगर, आनंद-छाया, खोडे पार्क, पपया नर्सरी, पिंपळगाव बहुला.

पिंपळगाव बहुला- तिरडशेतकडे जाणारा नंदिनी नदीवरील पूल
पूर्वी हा खूप छोटा पूल होता. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शेतकर्‍यांचे येणे-जाणे बंद व्हायचे. दळणवळणाची समस्या निर्माण झाली होती. स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र व ग्रामस्थ यांनी नगरसेवक स्व. सुदाम लक्ष्मण नागरे यांच्याकडे मागणी केली होती. दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर श्रीमती इंदूबाई सुदाम नागरे, नगरसेविका यांनी त्या कामाचा पाठपुरावा करून ताबडतोब मनपा आयुक्त व बांधकाम विभागाचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून त्यांना वस्तुस्थिती दाखवली. त्यानंतर ताबडतोब हा पूल करून घेतला. पुलाचे काम अतिशय सुंदर झालेले आहे. त्यामुळे स्थानिक शेतकरी, नागरिक व विद्यार्थी अत्यंत खूश आहेत.

राजकीय परिस्थिती

प्रभाग 10 मध्ये चारही नगरसेवक हे मागील वेळेस भाजपाचे निवडून आले होते; परंतु नंतरच्या काळात राजकीय परिस्थिती बदलली. चारपैकी इंदूबाई नागरे व पल्लवी पाटील यांनी भाजपा सोडून शिवसेना शिंदे गटात जाणे पसंत केले. त्यामुळे आता भाजपाकडून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी अनेक इच्छुक करीत आहेत. त्यामुळे भाजपाची उमेदवारी मिळावी, यासाठी अनेक इच्छुक गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळे कार्यक्रम व उपक्रम राबवून जोरदार तयारी करत आहेत. भाजपाकडून वाढलेल्या इच्छुकांमुळे उमेदवारी मिळण्यासाठी मोठी स्पर्धा दिसत आहे. भाजपा येथे जुनेच चेहरे रिपीट करणार की, नगरसेवकांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा पाहून काहींचे पत्ते कट करतो, याकडे लक्ष लागले आहे. भाजपाचे नगरसेवक निवडून आले असले, तरी पाच वर्षांत फारशी चमक दाखविता आली नाही, असा आरोप शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार करत आहेत. अशा परिस्थितीत महायुतीत एकत्र निवडणुका लढविणारी मंडळी एकमेकांचेच पत्ते कसे कट होतील, याची व्यूहरचना करत आहेत. शिंदे गटाकडूनही निवडणूक लढविणार्‍या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात शिवसेना उबाठाकडूनही काहींनी तयारी चालवली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे या भागात फारसे वर्चस्व नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सलिममामा शेख या भागातीलच असल्याने यावेळी मनसेकडूनही निवडणूक लढविणार्‍यांची संख्या तशी बर्‍यापैकी आहे. भाजपाचे दोन विद्यमान नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेल्याने त्यांच्या जागेवर नवीन चेहरे यावेळी रिंगणात राहतात का, याचे उत्तर
आगामी निवडणुकीच्या वेळी मिळणार आहे.

विद्यमान नगरसेवक

                                                                 शशिकांत जाधव,

                                                                पल्लवी पाटील,

                                                              इंदूबाई नागरे,

                                                                माधुरी बोलकर     

 

इच्छुक उमेदवार

शशिकांत जाधव, इंदूबाई नागरे, समाधान देवरे, रवींद्र देवरे, पल्लवी पाटील, रोहिणी देवरे, वैशाली देवरे, फरिदा सलिम शेख, बाळासाहेब जाधव, भगवान काकड, लोकेश गवळी, शरद शिंदे, इंद्रभान सांगळे, विश्वास नागरे, गोकुळ नागरे, अरुण घुगे, दीपक मौले, जान्हवी तांबे.

प्रभागात झालेली कामे

♦•• पिंपळगाव बहुला ते तिरडशेत पूल.
•♦• छत्रपती संभाजी महाराज उद्यान.
♦•• ग्रीन जिम.
♦•• छत्रपती शाळेपासून ते आनंद-छायापर्यंत काँक्रीटीकरण.
♦•• राधाकृष्णनगरला जलकुंभ.
♦•• राज्य कर्मचारी वसाहतीत काँक्रीटीकरण.

प्रभागाची सुरक्षा रामभरोसे
पंधरा वषार्ंपासून रस्त्याची कामे झालेली नाहीत. अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ता खचलेला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा हा नित्याचाच आहे. घंटागाडी आणि स्वच्छतेचे अभाव प्रभागामध्ये दिसून येतो. अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसतात. मोकळे भूखंड अस्वच्छ स्वरूपात आहेत. त्यांचा विकास झालेला नाही. प्रभागाची सुरक्षा रामभरोसे आहे. प्रभागात काही भागांत नगरसेवक फिरकलेलेही नाहीत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे.
– रवींद्र देवरे, सरचिटणीस, महाराष्ट्र औद्योगिक कामगार विकास सेना

प्रभागाचा विकास होण्याची गरज
प्रभाग दहामध्ये जास्तीत जास्त विकास होण्याची गरज आहे. त्यामुळेच गेल्या आठ वर्षांपासून वैयक्तिक खर्चातून अनेक उपक्रम चालू केले आहेत. घरोघरी निर्माल्य संकलन करण्यासाठी प्रभागात रथ चालू केला. त्याचा फायदा नागरिकांना होत आहे. ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे आगामी काळात ध्येय आहे. मुलांसाठी अभ्यासिका, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, महिलांसाठी रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
– समाधान देवरे, समाजसेवक व इच्छुक उमेदवार

अंतर्गत रस्ते चांगले, टिकाऊ करावेत
सावरकरनगर भागातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे गरजेचे आहे. गणपती मंदिराजवळील चेंबर दरवेळी तुंबते. त्यामुळे सर्व घाण पाणी रस्त्यावर येते. पावसाळ्यात तर येथे तळे साचते. शिवाय गणपती मंदिर ते अशोकनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य दिसते. त्यामुळे पथदीप दुरुस्त करण्याची गरज आहे.
– सुभाष महाजन, नागरिक

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *