शिवसेनेकडून सागर हिरे यांच्या रूपाने नवा चेहरा
नांदगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 17) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अनेकांंनी नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने थेट नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, माजी नगरसेवक किरण देवरे तसेच युवासेनेचे तालुकाध्यक्ष सागर हिरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळेला नांदगावच्या राजकारणात नवा ट्विट पाहायला मिळाला. यात राजेश कवडे, अरुण पाटील, तसेच किरण देवरे यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले. अर्थातच शिवसेनेतर्फे दिला जाणारा एबी फॉर्म हा अधिकृतरीत्या सागर हिरे यांना दिल्याने शिवसेनेच्या वतीने सागर हिरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने मातब्बरांना उमेदवारी नाकारत शिवसेनेतर्फे युवानेते सागर हिरे यांना अधिकृत उमेदवारी देत अनेकांना नवा धक्का दिला आहे.
नांदगाव नगरपरिषदेचे राजकारण गेल्या वीस वर्षांपासून राजेश कवडे, अरुण पाटील यांच्या भोवती फिरत राहिले. मात्र, यावेळेला आमदार सुहास कांदे यांनी नवी राजकीय खेळी करत अनपेक्षितपणे सागर हिरे यांना अधिकृतरीत्या उमेदवारी देत नांदगावच्या राजकारणाला नवी दिशा दिली. भाजपा वगळता सर्वच पक्षांनी पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एबी फॉर्म न दिल्याने नगराध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम राहिला. शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, शिवसेनेचे युवा नेतृत्व असलेले सागर हिरे या दोनच उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने दोघांपैकी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी कोणाला बहाल केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्ज छाननीच्या प्रक्रियेच्या वेळेला आमदार सुहास कांदे स्वतः हजर राहून सागर हिरे यांना पक्षाने अधिकृतरीत्या उमेदवारी देत असल्याचे जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
अनपेक्षितपणे उमेदवारी
मूळचे निमगाव येथील रहिवासी असलेले, तसेच अनेक वर्षांपासून नांदगाव शहरात वास्तव्यास असलेले सागर मदनराव हिरे यांना अनपेक्षितपणे शिवसेनेकडून (शिंदे गट) नांदगाव नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी अधिकृतपणे उमेदवारी दिली गेल्याने कट्टर व निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या कार्यकर्त्याला आमदार सुहास कांदे यांनी शिवसेने(शिंदे गट)कडून न्याय दिल्याची भावना अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. कुठलाही राजकीय वारसा नसलेला सर्वसामान्य कार्यकर्ता थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीपर्यंत मजल मारू शकतो, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे. सागर हिरे यांच्या रूपाने थेट नगराध्यक्षपदासाठी दिलेली उमेदवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी आहे. हिरे यांनी उमेदवारी मिळवत आपल्या राजकीय कारकिर्दीची पहिली पायरी पार केली आहे. आता थेट नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
विद्यमान नगरसेवक
सागर हिरे

राजेश कवडे

राजेश बनकर

संतोष गुप्ता