निफाड : विशेष प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून निफाड तालुक्यात वाढती थंडी जाणवत आहे. स्वच्छ सूर्यप्रकाश असतानाही हवेत गारवा वाढत आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे तापमानात सातत्याने घट होत आहे. निफाड शहर व ग्रामीण भागात थंडीचा कडाका जाणवत आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी घटणार आहे. डिसेंबरमध्ये थंडीचा कहर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
रब्बी पिकांसाठी वाढती थंडी वरदान
वाढती थंडी कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरत आहे. खरीप हंगाम संपल्यावर रब्बी हंगाम सुरू होतो. या हंगामात कांदा, गहू, हरभरा या पिकांना थंड हवामान आवश्यक असते. थंडी वाढल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. पावसामुळे लागवड उशिराने झाली तरी पिकांची वाढ चांगली होईल. राहुरी कृषी विद्यापीठात ६.९ अंश तापमानाची नोंद झाली. थंडीमुळे कीड-रोगांचे प्रमाण कमी होते. जमिनीतील ओल टिकून राहते. कडधान्ये आणि भाजीपाला पिकांना पोषक वातावरण मिळते. मात्र, द्राक्षबागांतील द्राक्षमण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आरोग्यावर परिणाम आणि आवश्यक काळजी
थंडी वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढतात. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, दमा, सर्दी-खोकल्याचे रुग्ण यांना त्रास होतो. रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामध्ये ताप, सांधेदुखी, त्वचाविकार यांचा समावेश आहे. शरीर उबदार ठेवणे गरजेचे आहे. सकाळी-संध्याकाळी गरम कपडे वापरा. गरम पाणी आणि हलका व्यायाम करा. सूप, तूप, गूळ, हळद, लसूण यांचा आहारात समावेश करा. रोगप्रतिकारशक्तीसाठी झोप, आहार आणि व्यायाम यांचा समतोल राखा, असे डॉ. दिलीप कुमावत यांनी सांगितले.
थंडीत सामाजिक उपक्रमांची गरज
पहाटे आणि रात्री गारठ्याचा प्रभाव वाढला आहे. नागरिकांना शेकोट्यांचा आधार घ्यावा लागतोय. ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. लोकरीचे कपडे, स्वेटर, जॅकेट, ब्लँकेट यांना मागणी वाढली आहे. रस्त्यावर झोपणारे गरजू आणि वृद्धाश्रम-अनाथाश्रमांतील लोकांसाठी उबदार कपड्यांचे वितरण गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्थांनी यासाठी पुढे यावे. निष्काळजीपणा टाळून सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी.