येवला : प्रतिनिधी
येवला तालुक्यात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यात बिबट्यांनी उच्छाद मांडला आहे. जळगाव नेऊर येथील प्रवीण शिंदे यांच्या वस्तीवर बिबट्याने शिरून तीन शेळ्या फस्त केल्या. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
बिबट्यामुळे वाढलेली भीती
तालुक्यातील अनेक गावांमध्ये अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. चार दिवसांपूर्वी पुरणगाव-शेवगे रस्त्यावर ऋषीकेश ठोंबरे या तरुणावर बिबट्या झडप घालण्याच्या तयारीत होता. त्याने आरडाओरड केल्यावर शेजारचे लोक धावले. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. सध्या गावागावात बिबट्यांची दहशत पसरली आहे. स्थानिकांनी या भागात चार ते पाच बिबट्यांचा वावर असल्याची माहिती दिली आहे.
कोणत्या गावांमध्ये आहे बिबट्याचा वावर?
एरंडगाव, धुळगाव, जळगाव, पुरणगाव, शेवगे, सातारे आणि बदापूर या गावांच्या शिवारात बिबट्या वारंवार दिसत आहे. शेतकरी आणि नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. कुत्र्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.
बिबट्याला लपायला जागा नाही
मका पीक उभे असताना बिबट्या या पिकात लपून राहायचा. आता मका पिकाची सोंगणी झाली आहे. त्यामुळे लपायला जागा नसल्याने बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसत आहे.
शाळकरी मुलांची सुरक्षा
शाळकरी मुले बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. मुलांना शाळेत पोहोचवण्यासाठी पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरीही रात्री घराबाहेर पडायला घाबरत आहेत.
बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा
स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. पिंजरे लावणे, रात्रीची गस्त वाढवणे आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना सुचवण्याची गरज आहे. लोकांनी रात्री घराबाहेर पडणे टाळले आहे. शेतात जाताना लोक गटागटाने जात आहेत. वन विभागाने त्वरित पाऊले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.