नाशिक विमानतळ विस्तारास प्रशासकीय मान्यता

नाशिक : प्रतिनिधी

प्रवासी क्षमता पोहोचणार एक हजारावर

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. हे विस्तारीकरणाचे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी हे निर्देश दिले आहेत. या विस्तारामुळे नाशिक विमानतळ (Nashik Airport) ची प्रवासी हाताळणी क्षमता ताशी एक हजार होणार आहे.

** बैठकीत काय ठरले?**

नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ही बैठक दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. यामध्ये हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड, नाशिक (ओझर) येथे नवीन इंटिग्रेटेड टर्मिनल इमारत बांधण्यास मान्यता मिळाली. यासोबतच प्रांगण, वाहतूक, अ‍ॅप्रन, पार्किंग, परिसर विकास आदी कामांनाही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

अंदाजित ५५६ कोटींचा खर्च

या विस्तारीकरणासाठी अंदाजित ५५६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विमानतळ विस्तारीकरणाबाबत राज्य शासन आणि एचएएल यांच्यात लवकरच सामंजस्य करार केला जाईल. या बैठकीत प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील (ग्रामीण), एचएएलचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

नाशिक विमानतळ विस्तार कसा होणार?

विस्तारीकरणामुळे १७,८०० चौरस मीटर क्षेत्रात नवीन प्रवासी टर्मिनल उभारण्यात येईल. तसेच १,१५,२२० चौरस मीटर क्षेत्रात नवीन अ‍ॅप्रॉन उभे राहील. यामुळे विमान पार्किंग आणि प्रवासी चढ-उतार सुलभ होतील. सध्या या नाशिक विमानतळावरून नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळुरूसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. रात्रीच्या वेळी विमान उतरविण्याची व्यवस्थाही येथे आहे.

सुविधांमध्ये वाढ

या विस्तारामुळे पार्किंगसाठी २५ हजार चौरस मीटर जागा उपलब्ध होणार आहे. तसेच पॅसेंजर बोर्डिंग, एरो ब्रीज, स्कॅनर आदी सुविधा उपलब्ध होणार आहेत. सध्या ताशी ३०० प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात. विस्तारीकरणानंतर ही क्षमता ताशी एक हजार प्रवाशांपर्यंत पोहोचेल. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळून रोजगारवृद्धी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *