सिन्नर बसस्थानकात दुर्दैवी घटना: नऊ वर्षांचा मुलगा ठार

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर बसस्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे. ब्रेक फेल झालेली बस थेट फलाटावर चढली. या अपघातात नऊ वर्षांचा मुलगा चिरडून ठार झाला. त्याच्या आईसह अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

अपघातात मुलाचा मृत्यू, तिघे जखमी

या अपघातात आदर्श योगेश बोराडे या नऊ वर्षाच्या मुलाचा अंत झाला. तो दापूर जिल्हा परिषद शाळेत तिसरीमध्ये शिकत होता. त्याची आई गौरी योगेश बोराडे (वय 30) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत असलेले नातलग विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव, ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव (रा. तामकडवाडी) हेही जखमी झाले आहेत. बोराडे कुटुंब मूळचे मुकणे (ता. इगतपुरी) येथील आहे. ते सहा महिन्यांपूर्वी व्यवसायानिमित्त दापूर येथे स्थायिक झाले होते.

नेमका अपघात कसा झाला?

सिन्नर आगारातून सिन्नर-देवपूर बस (एमएच 13- सीयू 8267) निघाली होती. चालक डी. सी. बनगैया (वय 45, रा. कुंभारी, ता. कोपरगाव) सकाळी 11 च्या सुमारास फलाट क्र. 8 वर बस नेत होते. ब्रेक न लागल्याने बस थेट एक फूट उंचीचे फलाट चढली. बस स्थानकातील मुख्य खांबावर आदळून हा अपघात झाला. या दुर्दैवी घटना मुळे स्थानकात मोठी खळबळ उडाली.

दुरुस्ती न झालेली बस चालकाच्या ताब्यात

अपघात झालेली बस सकाळी आठ वाजता कणकोरी येथून परत आली होती. तेव्हा ड्यूटीवर असलेल्या चालकाने ब्रेक लागायला अडचणी येत असल्याचा अहवाल दिला होता. ही बस डेपोमध्ये जमा करण्यात आली होती. तीच बस सकाळी 11 वाजता देवपूर फेरीसाठी चालकाच्या हातात सोपवली गेली. मधल्या काळात बसची दुरुस्ती झाली होती का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. चालकाने बस ताब्यात घेताना ती तपासली होती का, हेही पाहणे महत्त्वाचे आहे. निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप होत आहे.

Latest Update:

सिन्नर बसस्थानक अपघात: पाच जणांवर गुन्हा, तिघांचे निलंबन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *