खासगी अंतराळ क्षेत्रात भारताची भरारी

मोदींच्या हस्ते विक्रम-1 रॉकेटचे अनावरण

हैदराबाद :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि.27) हैदराबाद येथे स्कायरूट एरोस्पेसच्या ‘इन्फिनिटी कॅम्पस’चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी कंपनीच्या पहिल्या ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-1’ चे व्हर्च्युअली अनावरण केले. तीन वर्षांपूर्वी उद्योजकांसाठी खुले केलेल्या भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. यापूर्वी स्कायरूटने नोव्हेंबर 2022 मध्ये भारताचे पहिले खासगी सब-ऑर्बिटल रॉकेट ‘विक्रम-एस’ यशस्वीरीत्या प्रक्षेपित
केले होते.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताचे अंतराळ क्षेत्र वेगाने बदलत आहे आणि देशाने ‘विश्वसनीयता, क्षमता आणि मूल्य’ या त्रिसूत्रीवर आपली ओळख निर्माण केली आहे. युवा पिढीची नाविन्यता आणि जोखीम घेण्याची क्षमता नवीन उंची गाठत आहे. आगामी काळात भारत उपग्रह प्रक्षेपणामध्ये जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी ‘नॅशनल रिसर्च फाउंडेशन’, ‘वन नेशन, वन सब्सक्रिप्शन’ आणि एक लाख कोटींच्या रिसर्च आणि इनोव्हेशन फंडासारख्या प्रयत्नांद्वारे तरुणांसाठी मोठे संधी निर्माण केल्या जात असल्याचे सांगितले.
गेल्या सहा-सात वर्षांत अंतराळ क्षेत्राला अधिक खुले आणि नावीन्यपूर्ण बनवले गेले आहे. भारताची क्षमता आता जगातील काही निवडक देशांच्या बरोबरीची आहे, असेही ते म्हणाले.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *