सातपूरला युवकाने उचलले टोकाचे पाऊल
नेमके झाले तरी काय? कारण…..
सातपूर: प्रतिनिधी
येथील म्हाडा कॉलनीत काल रात्री एका युवकाने टोकाचे पाऊल उचलले. नेमके कारण मात्र समजू शकले नसते तरी या घटनेने कुटुंबातील सदस्यांना जबर धक्का बसला आहे.
अंबड लिंक रोडलगतच्या म्हाडा कॉलनी परिसरात शुक्रवारच्या रात्री एका युवकाने अचानकपणे जीवनयात्रेला पूर्ण विराम दिल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.
, अमोल ज्ञानेश्वर चौधरी (मूळ राहणार – धरणगाव, जि. जळगाव) असे संबंधित युवकाचे नाव असून तो पत्नी आणि लहान मुलासह म्हाडा कॉलनीतील दत्त मंदिर शेजारी राहत होता. रात्री घरातील इतर सदस्य झोपेत असताना अमोलने टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे.
शनिवारी सकाळी पत्नी घरातील स्वयंपाकघरात गेली असता तिला हा धक्कादायक प्रकार समोर दिसला. परिस्थिती पाहून ती क्षणात कोसळली व तिच्या आरडाओरड्यानंतर शेजारील नागरिकांनी तत्काळ धाव घेत पोलिसांना माहिती दिली. एमआयडीसी चुंचाळे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने अमोल याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, अमोलने असा टोकाचा निर्णय का घेतला, याचा तपास पोलीस पथकाकडून सुरू आहे. घरातील वातावरण, कोणतेही मानसिक ताणतणाव किंवा सामाजिक कारणे याबाबतही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
या दुर्दैवी घटनेने म्हाडा कॉलनी तसेच सातपूर परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी कुटुंबाच्या दुःखात सहानुभूती व्यक्त केली आहे.