परिवहन आयुक्त भिमनवार : 31 डिसेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी
पंचवटी : प्रतिनिधी
राज्य परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसविण्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. आता वाहनचालकांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत नंबरप्लेट बसविणे बंधनकारक असून, या मुदतवाढीमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ज्या वाहनचालकांनी नंबरप्लेट बसवली नसेल, त्यांनी 31 डिसेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी, असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन विभागाने आतापर्यंत वेळोवेळी एचएसआरपी नंबरप्लेटसाठी मुदतवाढ दिली होती.तर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात येत आहे.
आता ही मुदतवाढ अंतिम असून, एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे परिवहन आयुक्तांकडून सांगण्यात आले. राज्यात 2019 च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बंधनकारक आहे. नंबरप्लेट बसविण्याचे काम एका कंपनीला देण्यात आले असून, वाहनसंख्या आणि त्या तुलनेत एचएसआरपी नंबरप्लेटची नोंदणी करून ती बसविण्यासाठी लागणारा कालावधी अधिक जात आहे.त्यामुळे एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याला मुदतवाढ मिळावी याबाबत सर्व स्तरातून मागणी होत होती. त्यानुसार एक महिन्याची मुदतवाढ दिल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली आहे.
वाहन मालकांनी वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या http://transport.maharastra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता दि. 31 डिसेंबर 2025 पर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी. – विवेक भिमनवार, परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य