सिन्नर पोलीस आणि नगरपालिकेची कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल
सिन्नर : प्रतिनिधी
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी वापरला जाणारा जीवघेणा नायलॉन मांजा अवैधरीत्या विक्री करणार्या तीन ठिकाणी धाडी टाकून सिन्नर शहरातून सुमारे 10 लाख 42 हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला. सिन्नर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 9 लाख 41 हजारांचा तर नगरपरिषद प्रशासनाने दोन ठिकाणी टाकलेल्या सुमारे एक लाखाचा मांजा जप्त करण्यात आला आहे.
आशुतोष उर्फ शंकर राजेश शिंदे (25 वर्षे, रा. सुतारगल्ली, सिन्नर) यास सिन्नर पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले. त्याच्याकडून 9 लाख 40 हजार 800 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा सर्रास वापरला जातो.
या मांजामुळे पशू-पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. तसेच दुचाकीस्वार, पादचारी नागरिकांना अपघात होऊन मोठ्या दुखापती होत आहेत. गेल्या काही दिवसांत नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वारांच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या. गळा चिरणे, हाताची बोटे कापणे, चेहर्याला इजा अशा दुखापती झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये नायलॉन मांजा वापराविरोधात असंतोष निर्माण झाला आहे. नायलॉन मांजा विक्री व वापरावर प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या सूचनेनुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे हवालदार समाधान बोराडे, नितीन डावखर, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे यांचे पथक तयार केले. या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या पथकाने छापा टाकून अवैधरीत्या नायलॉन मांजा विक्री करणारे आशुतोष उर्फ शंकर राजेश शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 9 लाख 40 हजार 800 रुपये किमतीचे नायलॉन मांजाचे सुमारे 1104 रीळ जप्त करण्यात आले. याप्रकरणी शिंदे यांच्याविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बीएनएस 2023 चे कलम 223, 292, 293 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस नाईक हेमंत तांबडे करीत आहेत. अवैधरीत्या नायलॉन मांजाविषयी कोणालाही काही माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना माहिती कळवावी. माहिती देणार्याची गोपनीयता ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी
केले आहे.
सिन्नर नगरपरिषदेच्या अधिकारी-कर्मचार्यांच्या पथकाने दोन ठिकाणी छापा टाकून नायलॉन व साधा मांजा मिळून 207 रीळ जप्त करण्यात आले. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेकडून नायलॉन मांजा विक्री करणार्यांची शोधमोहीम राबविण्यात आली. यादरम्यान नगरपरिषदेच्या पथकाने शहरातील प्रकाश छगनलाल हलवाई व प्रमोद रमेश मोरे यांच्याकडे छापा टाकला असता नायलॉन मांजाचे 141 मोठे व 60 छोटे तर साध्या मांज्याचे 6 रीळ मिळून आले.
नगरपरिषदेच्या पथकाने सर्व मांजा जप्त केला. मुख्याधिकारी अभिजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख, अनिल जाधव, श्रीमती सोनवणे, श्रीमती गांगुर्डे, मुळे, दीपक भाटजिरे, विजय वाजे, दिलीप गोजरे, प्रशांत मेश्राम, गणेश गुंजाळ, धोंडीराम जाधव, राकेश डिसले, प्रवीण भोळे, संजय मुरकुटे, अलका गांगुर्डे, दीपक पगारे, ताहीर शेख, भूषण घोरपडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.