लक्ष्यवेध : प्रभाग-15

नंदिनी नदी अरुंद पुलावर नेहमीची होणारी वाहतूक कोंडी.
नाशिक महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांच्या मूलभूत अडचणी मात्र जैसे थे असल्याचे चित्र दिसून येत आहे. 2017 च्या निवडणुकीत या प्रभागातून माजी उपमहापौर तथा माजी आमदार वसंत गिते यांचे पुत्र प्रथमेश गिते, तसेच अर्चना थोरात आणि सुमन भालेराव या भाजपच्या तिन्ही उमेदवारांनी विजय मिळवला होता. उपमहापौरपदाची जबाबदारीही याच प्रभागावर लाभली होती. त्यामुळे विकासाच्या अपेक्षाही अधिकच होत्या. कार्यकाळात काही ठिकाणी रस्ते, पाणीपुरवठा, पथदीप, भुयारी गटार, भूमिगत विद्युत तारा, जलकुंभ यांसारख्या अनेक सुविधा उपलब्ध करण्याचे प्रयत्न झाल्याचे मान्य करावे लागेल. परंतु, या प्रयत्नांनंतरही अनेक भागांमध्ये परिस्थिती चिंताजनकच आहे. कचरा व्यवस्थापनाची ढिलाई, सांडपाणी वाहतूक व्यवस्थेतील उणिवा, पाण्याची समस्या, वारंवार बंद पडणारे पथदीप, नंदिनी नदीवरील अपूर्ण संरक्षक भिंत, अरुंद पुलामुळे निर्माण होणारी कायमस्वरूपी वाहतूक कोंडी, तसेच मुख्य रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग या सर्व समस्यांनी नागरिकांचे दैनंदिन जीवन आजही त्रस्त आहे. स्थानिक प्रतिनिधींनी अपेक्षित पातळीवर प्रश्न सोडविण्यास गती दिली नसल्याची नाराजी मतदार व्यक्त करीत आहेत. उपमहापौरांचा प्रभाग असूनही काही मूलभूत समस्या जशाच्या तशा आहेत, अशी स्पष्ट भावना अनेक नागरिकांत दिसून येत आहे.
राजकीय परिस्थिती
प्रभाग क्रमांक 15 मध्ये आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, अनेक नामांकित चेेहरे रणांगणात उतरले आहेत. या प्रभागात माजी आमदार वसंत गिते यांचे चिरंजीव माजी उपमहापौर प्रथमेश गिते, माजी नगरसेविका सुमन भालेराव यांचे पुत्र मिलिंद भालेराव, तसेच माजी नगरसेविका अर्चना थोरात हे आपल्या समर्थकांसह जोरदार तयारीत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसकडून औसाफ हाश्मी, तसेच माजी नगरसेवक मुशीर सय्यद यांचे भाचे कामरान सय्यद यांनीही निवडणुकीत उडी घेतल्यामुळे स्पर्धेला अधिकच चुरस आली आहे. याशिवाय, माजी नगरसेवक गुलजार कोकणी, सचिन मराठे तसेच एमआयएमचे माजी शहराध्यक्ष अहमद काजी यांची पत्नी राहत काजी यांनीदेखील आपल्या उमेदवारीची चाचपणी सुरू केली असून, या प्रभागात अनेक दिग्गजांची ताफेबंदी सुरू झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 हा परंपरेने तिन्ही सदस्यांसह भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे यावेळीदेखील भाजप मजबूतपणे रिंगणात उतरणार हे निश्चित. मात्र, विरोधी पक्षांतून अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार एंट्री केल्याने या प्रभागातील निवडणूक अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक प्रश्न, संघटनांची हालचाल, जातीय आणि सामाजिक समीकरणे, तसेच पक्षनिष्ठा या सर्वांचा मिलाफ होत असताना प्रभाग क्रमांक 15 हे या निवडणुकीचे हॉटस्पॉट वॉर्ड ठरण्याची दाट शक्यता आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमुळे येथे मतदारांच्या संभ्रमात वाढ होण्याचीही चिन्हे दिसत आहेत. आगामी दिवसांत उमेदवारांची अंतिम निवड आणि पक्षांतील घडामोडी यानुसार या प्रभागाचे राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.
विद्यमान नगरसेवक

प्रथमेश गिते

अर्चना थोरात

सुमन भालेराव
प्रभागाचा परिसर
भाभानगर, जनरल वैद्यनगर, मिरजकरनगर, स्टेट बँक कॉलनी, काठे गल्ली, अनुसयानगर, गीताईनगर, घरकुल, बनकर चौक, रवींद्र विद्यालय परिसर, शंकरनगर परिसर.
2011 नुसार लोकसंख्या
लोकसंख्या ः 40,141
अनुसूचित जाती ः 2,194
अनुसूचित जमाती ः 1296
इच्छुक उमेदवार
प्रथमेश गिते, सचिन मराठे, गुलजार कोकणी, संदीप लेनकर, मिलिंद भालेराव, औसाफ हाश्मी, कामरान सय्यद, राजेश गांगुर्डे, विशाल पवार, नाना शिलेदार, विनायक कस्तुरे, असलम खतीब, गौरव पगारे, स्मितेश पाठक, अमर गांगुर्डे, सुभान शेख, रोशन शिंदे, गणेश तांबे, प्रकाश रकटे, राहुल घोडे, राकेश मुनशेट्टीवार, अर्चना थोरात, राहत काजी, योगिता ठाकरे, सचिन काठे, संदीप बनकर, शुभम गायकवाड, मुजाहिद फारुकी, अनिता भामरे, तेजश्री काठे, सूरज वनमाळ, शिल्पा चव्हाण, आकाश गरड, प्रिया मुनशेट्टीवार, सीमा पवार, प्रियंका काठे, संजना लासुरे, जबिन पठाण, पूजा आहेर, कविता काठे.
प्रभागात झालेली कामे
भाभानगर, मिरजकरनगर येथे पाण्याची पाइपलाइन
पखाल रोड येथे 20 लक्ष लिटर जलकुंभ
भाभानगर, वैद्यनगर, कानडे उद्यान, त्रिकोणी उद्यान आदींचे सुशोभीकरण
प्रभागात आवश्यक त्या ठिकाणी ग्रीन जिम बसवण्यात आली.
सिद्ध गौतम व विश्वभारती सोसायटी रस्ता काँक्रिटीकरण
तिगरानियाचा मुख्य रस्ता डांबरीकरण
विद्युत तारा भूमिगत करण्यात आल्या
निर्मल कॉलनी येथे ज्येष्ठ नागरिकांकरिता दुमजली हॉल
लोकमान्य हॉल नूतनीकरण
प्रभागातील समस्या
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
अवजड वाहनांची वाहतूक
नंदिनी नदीची अपूर्ण संरक्षक भिंत
नंदिनी नदीवरील अरुंद पुलामुळे वाहतूक कोंडी
मुख्य रस्त्यांवर बेकायदा पार्किंग
नागरिक म्हणतात…

प्रभागात तसा बर्यापैकी विकास झालेला आहे, परंतु प्रमुख समस्या म्हणजे नंदिनी नदीचा अरुंद पूल असल्यामुळे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असून, या पुलाचे तातडीने रुंदीकरण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे, तसेच प्रभागातील रस्त्यांवरील वाहनांची पार्किंगदेखील नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. – कैलास सैंदाणे, रहिवासी
प्रभाग क्रमांक 15 मध्ये सह्याद्री सिग्नलवर वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागते. वाहनधारक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहेत. अनियमित घंटागाडीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पखाल रोड व प्रभागात इतर ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नेहमीची झाली आहे. सफाई कामगार नियमित येत नाहीत. – नईम (मामू) शेख, ज्येष्ठ नागरिक
प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्या मूलभूत अडचणी दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. पाण्याची टंचाई हा सर्वांत मोठा प्रश्न ठरत असून, काही भागात नळांना अत्यंत कमी दाबाने पाणी येते आहे. मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत कॉलनीपर्यंत सफाई व्यवस्थेचा अभाव स्पष्ट दिसतो. कचर्याची नियमित उचल न झाल्याने अस्वच्छता वाढते आणि आजारांचे प्रमाणही वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांबरोबरच पादचार्यांनाही त्रास सहन करावा लागतो. नागरिकांनी वर्षानुवर्षे विकासाची अपेक्षा ठेवली असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र दिसत नाही. मूलभूत सुविधांचा अभाव प्रभागाचा सर्वांत मोठा प्रश्न बनला आहे. पाणी, स्वच्छता आणि रस्ते या तिन्ही बाबतीत ठोस उपाययोजनांची तातडीने गरज आहे. – औसाफ हाश्मी, रहिवासी
नंदिनी नदीकाठची सिटेलिंग वॉल अनेक ठिकाणी निकृष्ट स्थितीत दिसून येते. नदी परिसरामध्ये कचर्याचे ढिगारे वाढत असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. साहिल लॉन्स आणि हाजी लॉन्स परिसरात वाहतुकीची सततची कोंडी होऊन नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. नंदिनी नदीवरील अरुंद पूल हा मोठा धोका ठरत असून, वाहतुकीसह पादचार्यांनाही अडथळा निर्माण करतो. परिसरात पाण्याची अनियमितता, घंटागाडीची वेळेवर न येणारी सेवा, तसेच अपूर्ण रस्ते या समस्या वारंवार जाणवतात. भुयारी गटार व्यवस्थेचा अभाव, गार्डनची स्वच्छता न राखली जाणे आणि समाजमंदिराची देखभाल न होणे या गोष्टी स्थानिकांच्या दैनंदिन जीवनावर प्रतिकूल परिणाम घडवतात. – कामरान सय्यद