मत जातीवरच दिले जाते ही शोकांतिका

ना. झिरवाळ : मनमाड नगरपरिषद निवडणूक प्रचारसभा

मनमाड : प्रतिनिधी
देशात कोणाचेही रक्त कोणालाही चालते, पण मत देताना मात्र जातीचाच विचार केला जातो. पुरोगामी देशात ही शोकांतिका असल्याचे नमूद करून मनमाड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी मागासवर्गीय समाजाचा उमेदवार देऊन पक्षाने पुरोगामित्व सिद्ध केले, असे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.
मनमाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनमाड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ व विधान परिषद सदस्य पंकज भुजबळ यांची जाहीर सभा झाली. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उमेदवार प्राजक्ता नलावडे, रिपाइंचे पी. आर. निळे, पत्रकार आमिन शेख, जाफर मिर्झा आदींची भाषणे झाली. यावेळी पंकज भुजबळ यांनी मनोगतात माझ्या काळात सर्वांना खुले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य होते. मी स्वतः मनमाडच्या पाणीप्रश्नावर काम केले असून, अजित पवारांकडून मनमाड नगरपरिषदेची नऊ कोटींची वीजबिल माफी करून आणली आहे. नरहरी झिरवाळ यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार रवींद्र घोडेस्वार यांचा नगराध्यक्ष म्हणून उल्लेख करून तुमचा विजय नक्की असल्याचे अधोरेखित केले. सुधाकर मोरे यांनी सूत्रसंचालन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *