नाशिक : प्रतिनिधी
नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक- 2025 साठी आज (दि. 2) जिल्ह्यात मतदान होणार आहे. मतदारांना निश्चितपणे मतदान करता यावे यासाठी खाजगी आस्थापनांतील सर्व कामगार, कर्मचारी व अधिकार्यांना भरपगारी सुट्टी देण्यात आल्याची माहिती कामगार उपायुक्त विकास माळी यांनी दिली. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 28 नोव्हेंबरच्या शासन परिपत्रकानुसार ही सुट्टी देणे सर्व आस्थापनांना बंधनकारक आहे.
दुकाने, हॉटेल्स, खाद्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, नाट्यगृहे, कारखाने आदी सर्व आस्थापनांना हा निर्णय लागू राहणार आहे. मतदानाच्या दिवशी कामानिमित्त निवडणूक क्षेत्राबाहेर असले, तरी संबंधित कामगारांचा मतदार म्हणून समावेश असल्यास त्यांना सुट्टी देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान दोन ते तीन तासांची मतदानासाठी सवलत देता येईल. मात्र, त्यासाठी महानगरपालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकार्यांची पूर्वपरवानगी आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी आवश्यक वेळ दिला जावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी दि. त्र्य. पाटोळे, तु. गं. बोरसे, नि. रं. खैरनार आणि यो. मा. जाधव यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे माळी यांनी कळविले आहे.