नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर

लासलगाव : वार्ताहर
द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख मिळवलेल्या नाशिक जिल्ह्याला आता नव्या संकटाने ग्रासल्याचे चित्र तयार झाले आहे. ‘द्राक्षांची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. निफाड तालुक्यातील देवगाव, रुई, गोंदेगाव आणि मरळगोई या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढला असून, भीतीचे सावट गडद झाले आहे.
रोज सकाळी आणि संध्याकाळनंतर रस्त्यांवर, शेतात, घरांच्या वस्तीजवळ बिबट्या हिंडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. गुरेढोरे, वासरे व शेळ्यांवर होणारे हल्ले आता दैनंदिन झाले आहेत. अनेकांनी घराजवळ फिरणार्‍या बिबट्यांचे व्हिडिओ टिपले असून, त्यांचे सोशल मीडियावरही व्हायरल प्रकरणे वाढली आहेत. यामुळे विशेषतः महिलांना व मुलांना बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे.
वनविभागाने पिंजरे लावणे, टेहळणी वाढवणे आणि जनजागृती मोहिमा अशा उपाययोजना सुरू केल्या आहेत; मात्र त्यात अपेक्षित वेग नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. ‘बिबट्यांचा वावर आता रोजचा झाला आहे. तरीही कोणतीच ठोस कारवाई दिसत नाही. जीवितास धोका निर्माण झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया अनेक चिंताग्रस्त नागरिकांनी दिली.
परिसरातील ऊसशेती, दाट झाडी, ओढे-नाले व टेकाडे बिबट्यांसाठी अनुकूल अधिवास ठरत आहेत, हे वनविभागही मान्य करतो. परंतु, त्यांच्या हालचाली मानवी वस्त्यांच्या अगदी जवळपर्यंत पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीची, समन्वित आणि सर्वांगीण योजना आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, नागरिकांनी संध्याकाळनंतर बाहेर जाणे टाळावे, जनावरांना सुरक्षित बांधावे आणि बिबट्यांची संशयास्पद हालचाल दिसताच वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
शेतीप्रधान नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण जीवनात निर्माण झालेली ही नवी ‘बिबट्यांची पंढरी’ ही ओळख प्रशासनासमोर गंभीर आव्हान बनली असून, आगामी काळात या भीषण संघर्षाचा कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यावश्यक ठरणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *