पुणे : प्रतिनिधी
राज्यात बहुतांश ठिकाणी नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. 284 पैकी केवळ 24 ठिकाणच्या निवडणुका बाकी असताना, निवडणुका पार पडलेल्या भागातील निकाल राखून ठेवणे म्हणजे मतदारांसोबत केलेला भावनिक खेळ आहे, असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी (ता.3) व्यक्त केले. उच्च न्यायालयाने 1 डिसेंबरला पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालासंदर्भात दिलेल्या निर्देशाचे पालन करावे लागेल. मात्र, यापुढे निवडणुका घेऊन निकाल राखून ठेवण्याची वेळ आयोगावर येणार नाही, याची काळजी राज्य निवडणूक आयुक्तांनी घ्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले. येत्या काळात आयोगाला आणखी निवडणुका घ्यायच्या आहेत. अशात निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणण्याची नितांत आवश्यकता असल्याचे पाटील म्हणाले. गेल्या चार ते पाच दशकांत पहिल्यांदाच अशाप्रकारे निवडणूक निकाल पुढे ढकलण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. आरक्षण मर्यादेबाबतच्या निर्बंधांमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या 24 नगरपरिषदांच्या निवडणुकांमुळे उच्च न्यायालयाने सर्व निवडणुका पार पडल्यानंतरच एकत्रितपणे 21 डिसेंबरला निकाल जाहीर करावेत, असे निर्देश दिले आहेत. मात्र, निवडणूक आयोग स्वायत्त आहे. असे असताना यंत्रणेच्या अपयशामुळे निकाल पुढे ढकलले जाणे योग्य नाही, अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली.