गणेश चौक परिसरात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

सिडको : विशेष प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इलेक्ट्रिकल केबल अंडरग्राउंड करण्याचे काम सुरू असताना गणेश चौक स्टेट बँक चौक जवळ मनपा अग्निशामक कार्यालयाजवळील रस्त्यावरील खोदकामामुळे महापालिकेची पिण्याचे पाणी पुरवणारी लाइन फुटली. या कारणाने हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत गेले. या ठिकाणी महापालिकेच्या रहिवासी इमारतीच्या पटांगणात पाण्याचा मोठा डोह साचल्याने जणू काही पूरस्थिती निर्माण झाल्यासारखे दिसत होते. परिणामी, इमारतीतील रहिवाशांना घराबाहेर येणे अवघड झाले. पार्क केलेल्या गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने दुचाकी, रिक्षा बंद पडल्या.

सकाळी मॉर्निंग वॉक करताना रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसले. वॉलमन यांना पाणी थांबवता येईल यासाठी माहिती दिली, पण हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले. संबंधित कंत्राटदाराने योग्य खबरदारी न घेतल्याने ही परिस्थिती निर्माण झाली.
– दीपक लांडगे, सामाजिक कार्यकर्ते

बिल्डिंगच्या खाली पूरस्थिती झाली होती. पहाटे कामावर जात असताना रस्त्याच्या बाजूने इमारतीच्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसले, घराबाहेर पडणे अवघड झाले. रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यातून पाणी येत असल्याचे समजले. जलवाहिनी
फुटल्याने नळाला पाणी कमी आले.
– सुनिल राठोड, स्थानिक रहिवासी

पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून अधिकार्‍यांना परिस्थितीचे गांभीर्य सांगितले, पण अर्धा ते पाऊण तास थांबूनही पाणी बंद झाले नाही. प्रशासनाकडे अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजनेचा अभाव दिसतो. भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कंत्राटदार आणि प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी.
– कुणाल धात्रक, सामाजिक कार्यकर्ते

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *