भारतावर जेवढी आक्रमणे झालीत, ती पश्चिमेकडून खैबर खिंडीतून झालीत. चार हजार वर्षांपूर्वी आर्य आपले पशुधन घेऊन हिरवळ आणि पाण्याच्या शोधात सिंधू नदीच्या काठावर वसले. नद्यांना बारा महिने पाणी, घनदाट जंगले यामुळे माणसाच्या वसाहतीला अनुकूल भौगोलिक रचना. जनावरांना चार्याकरिता हिरवळ मुबलक मिळाल्याने पश्चिम दिशेकडून आलेल्या टोळ्यांनी भारतात वसाहती केल्या. शक आले, हून आले, कुशाण आले.
अफगाणिस्तानपासून वाळवंट सुरू होते ते इजिप्तपर्यंत. म्हणजे आफ्रिकेपर्यंत ते पसरले आहे. भारतातील घनदाट सदाहरित जंगलांत त्यांना वसाहती करून राहणे पोषक हवामानामुळे शक्य झाले. पुरातन संस्कृती नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. हिरवळ आणि पाणी या दोन नैसर्गिक संपत्तीने भारतात येण्यास प्रोत्साहित केले. जंगल व पाणी निसर्गाने दिलेले वरदान आहे. कृषी संस्कृती बहराला येण्यास या दोन बाबी कारणीभूत ठरल्या. उत्तरेकडे असलेला हिमालय त्यावर घनदाट अरण्य पसरले होते. पर्वतावरून वाहत येणार्या नद्या बंगालच्या उपसागरात मिळताना काठावरचा प्रदेश सुपीक करत वाहतात. गंगा, यमुना, अलकनंदा या नद्यांमुळे त्याच्या काठावर माणसांच्या वस्त्या वाढल्या. घनदाट गर्द वनराईने लोकांना, इथल्या आदिवासींना उपजीविकेसाठी वनस्पती, मध व पशुपालनांचे उद्योग दिले. युरोप बर्फाळ प्रदेश पिकांना
पोषक नाही.
अरेबियन देशात रखरखीत वाळवंट, त्यामुळे इथे मानवी वस्त्यांना बहरण्यास वाव नव्हता. वन आणि जन एकत्रित बहरले. वनस्पतीमधील विविधता, झाडांना नटलेले पर्वत ही प्रकृतीने भारतावर उधळलेली श्रीमंती आपण विसरून गेलो. निसर्गात ढवळाढवळ करून जंगल, पर्वतांना ओरबाडण्याचे काम 50 वर्षांपासून चालू आहे. वृक्षांच्या कत्तलीने हिमालय ओसाड झाला. इथल्या वनस्पती व वन्यप्राणी बेघर झाले. प्राण्यांची प्रजाती नाश पावल्या. हिमालयाच्या पायथ्याशी असलेली देवभूमी ओसाड झाली. हिमालयात रस्ते व बोगदे कोरल्याने व येथील बेसुमार वृक्षसंहाराने निसर्गाचा समतोल बिघडल्याने दरड कोसळणे. मलब्याखाली गावे गाडली जात आहेत.
जोशीमठ येथे पर्यटकांची गर्दी असल्याने लॉजिंग, बोर्डिंग व हॉटेलचा व्यवसाय भरभराटीस आला. येथील वृक्ष आपल्या मुळाने जमिनीला घट्ट पकडून ठेवायचे. वृक्ष समूळ नष्ट केल्याने पावसाचे पाणी येथील खडकांच्या मुळातील माती वाहून नेतात. दरड कोसळून रस्त्यावर आल्याने वाहतूक बंद होते. लोकांचे व्यवहार थांबतात. उपभोगाच्या लोभातून माणूस निसर्गाला, डोंगरांना, त्यावरील झाडांना अंधाधुंदपणे लुटतो आहे. माणसांच्या वसाहती वाढल्या. सिमेंटच्या जगलांनी निसर्गाची वाट लावली. विकासाच्या धुंदीतून विनाशाकडे सुरू झालेला प्रवास मानव संस्कृतीला लागलेले ग्रहण आहे. वृक्ष हे निसर्गाने पुरवलेले पंखे आहेत, ते शुद्ध हवा देतात. तेथील औषधी जडीबुटी रोगावर दवा देतात. झाडे ऑक्सिजन पुरवणारे शुद्धीकरणाचे प्रकल्प आहेत. एक पिंपळाचे झाड 300 माणसांच्या प्राणवायूची गरज भागवते. देशाच्या एकून क्षेत्रफळाच्या 33 टक्के भाग वनांनी व्यापलेला असावा. जनांनी जल, जंगल, जमीन व पर्वत विकासाच्या हव्यासापायी उजाड केले. डोंगरांना झाकणारे वृक्ष कापून पर्वत उघडे केले. कपडे धुण्यापासून गाड्या धुण्यापर्यंत सर्व कामे नदीच्या पाण्यात होतात. नदीचे पाणी पिण्यालायक शुद्ध होते, पण आता पाण्यात आंचमन करणे दूर, आंघोळ करणेही अशक्य झाले आहे. नदीत अस्थी टाकण्यापासून निर्माल्य फेकण्यापर्यंत धार्मिक विधी होतात. अनेक सण व उत्सव नदीला दूषित करत आहेत. नदीला माता म्हणतात, गंगामाई व गोदामाई म्हणतात. एकीकडे मान तर दुसरीकडे घाण करून नद्यांना गटारी केल्या आहेत. हिरवळ आणि पाणी तिथे सुचतात. मजला गाणी, बा. भ. बोरकर यांची कविता ऐका अथवा निसर्गाचे सौंदर्य वर्णन करण्यात कवींनी प्रतिभा पणाला लावली आहे.
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे. मंगेश पाडगावकरांच्या या कवितेत निसर्गाच्या सान्निध्यात जीवन कसे समृद्ध झाले आहे. जगणे हे उत्सव बनते. वनांचे वैभव डोळ्यातून हृदयात शिरते व जीवन आनंदाचे लाटेवर डोलू लागते. येणे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत.. संत तुकाराम महाराजांना वृक्षवेलींचा सहवास एकांतात राहण्याचा आनंद मिळतो व गर्दीत अनेक माणसांचे गुण, दुर्गुण आपल्याला नकळत लागतात. त्यातून मनाची स्थिरता व शांती भंग पावते. जीवनाचे रहस्य व जगण्याचा अर्थ माणसाला एकांतात कळतो. शोध लावणारे संशोधक, काव्य लिहिणारे लेखक व ध्यान करणारे साधक एकांतात वास करतात तेव्हा गूढ सिद्धांताचा शोध लागतो. झाडाखाली तपस्या करून जीवनाचा शाश्वत शांतीचा मार्ग गौतम बुद्धांना झाला. जे काही उत्तम, उदात्त, उन्नत, साहित्य लिहिले गेले. ज्ञान विज्ञान याची निर्मिती वृक्षवेलींच्या सहवासात झाली. एकांताचा वास व शुद्ध हवेचा श्वास फक्त वनात मिळतो. याकरिता आले मनात तर चला तपोवनात. विवेक व वैराग्य सगळ्यांच्या मनात येत नाही. उदात्त व उन्मनी विचार हमेशा येत नाही. कधीतरी आपले भाग्य सत्कर्माने जागे होते. शुद्ध भावना जर जागी झाली तर वेळ न दवडता माणसाने तपोवनाकडे धाव घ्यावी, असे संताचे दीपस्तंभासारखे विचार विसरून आम्ही तपोवन उद्ध्वस्त करण्यास टपलो आहे ही शोकांतिका आहे. साधूंचे बिर्हाड काही दिवसांकरिता वसवण्यासाठी कायम सावली देणार्या झाडांवर कुर्हाड कोसळणार आहे. नाशिकमध्ये विशाल वड होते, ते कापल्याने सावलीची परवड झाली आहे. उन्हापासून वाचवणारे हे सुरक्षागड रस्ता रुंदीकरणाच्या कामात भुईसपाट झाले. सीतागुंफापर्यंत तपोवन पसरलं होतं. एकंदर बाराशे एकरात तपोभूमी पसरली होती. ती आकसत जाऊन आतापर्यंत फक्त 55 एकर तपोवन उरले आहे. सिंहस्थाची पर्वणी साधून साधुग्राम तात्पुरते वसवून मोकळ्या मैदानात कॉन्फरन्स हॉल, मॉल, सभागृह उभारण्याचा डाव खेळला जातो आहे. तपोवन हे लोकांचे फुफ्फुस निरोगी ठेवणारे प्राणवायूचे सिलिंडर आहे. मोटारीच्या धुराने लोकांचे श्वास कोंडले आहेत. उन्हाच्या झळा लोकांना पोळत आहे. आईची माया व वृक्षांची छाया यांना मोल नाही. आईच्या मायेच्या कुशीत माणसं निर्भय असतात. वृक्षांच्या सावलीत जीवनातला ताप शांत होतो.
जंगल पर्वतांचे महत्त्व शिवाजी महाराजांनी ओळखले. जंगलांच्या पळवाटात व चोरवाटांत शत्रूंना थोड्या सैनिकांत घेरता येते. ऐनवेळी पळून जाता येते. डोंगरांच्या अवघड वाटात गनिमी काव्याने लढता येते. प्रबळ शत्रूशी मैदानी प्रदेशात लढणे अवघड असते. जंगलदर्यांत शत्रूला गाठून पराभूत करता येते. यासाठी महाराजांनी दाट झाडी असलेल्या कोकणपट्टीत राज्य स्थापन केले. कोकणाला समुद्र किनारा असल्याने महाराजांनी आपले आरमार उभे केले. पर्वत व जंगलांनी स्वराज्याला कवच पुरवले. सह्याद्रीत व त्यांच्या जंगलांत शिवाजी महाराज सिंह होते. त्यांची युद्धनीती जंगलदर्यांनी यशस्वी केली. जावळीच्या प्रतापगडावर घनदाट जंगल होते. तिथे अफजलखानाला बोलावून घेण्यात आले. आपल्या सोयीस्कर ठिकाणी अफजलाखानाला आमंत्रण दिले. त्यांच्या सैन्याला झाडामागे लपता आले. नगारा वाजण्याची खूण म्हणजे दाट झाडीत दडून बसलेल्या तिरंदाजांना बाण सोडण्याचा इशारा होता. औरंगजेबाने विजापूरच्या मोहम्मद आदिलशहाला सल्ला दिला की, शहाजीराजांना महाराष्ट्रात न ठेवता कर्नाटकात जहागिरी द्यावी म्हणजे त्यांना झाडावनात लपता येणार नाही. अचानक हल्ला करून पळून जाता येणार नाही. शहाजीराजांना कर्नाटकात राहावे लागले. झाड व पहाड याचे महत्त्व शिवाजी महाराजांनी हेरले. यातून त्यांची दूरदृष्टी दिसते. पण त्यांना आदर्श मानून त्यांचा गजर करणार्या मुख्यमंत्र्यांना तपोवनाचे महत्त्व व उपकार ओळखले नाही. नाहीतर त्यांनी वृक्षसंहाराचे फर्मान काढले नसते. गल्लीबोळात देवाभाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुले वाहणारे पोस्टर छापून 9 कोटी रुपयांची जाहिरात केली नसती. 9 कोट नारायणाची सेवा हा राजधर्म विसरून ते तपोवनाला उद्ध्वस्त करायला निघाले. वृक्षहत्येचे पाप त्यांना भोगावे लागेल. तेथील पशुपक्ष्यांचे घरटे मोडून त्यांचे शाप देवाभाऊंना भोगावे लागतील. 24 हजार कोटींचा निधी साधूंकरिता खर्च करायचा ज्याचे काही योगदान नाही. 65 मराठी शाळा बंद करून 5 हजार गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करायचे. अतिवृष्टीने पीडित शेतकर्यांचे उद्ध्वस्त जीवन सावरण्याऐवजी हा निधी सत्कारणी लावला तर बळीराजाला आधार मिळाला असता. भावी पिढीला सावली देण्यासाठी व शहराला तापलेली भट्टी न बनवता हिरवे नाशिक, सुंदर नाशिक घडवावे ही नागरिकांची तळमळीची इच्छा आहे.