वर्षभरात देशातील सर्व टोलनाके बंद होणार
नवी दिल्ली :
पुढील एका वर्षात कुठेही टोल दिसणार नाहीत. त्याचप्रमाणे टोलच्या मोठ्या रांगेत उभे राहण्याचीदेखील गरज पडणार नाही. यासाठी केंद्र सरकार एका विशेष प्रणालीवर काम करत आहे. ही प्रणाली देशभरात लागू झाल्यानंतर कोणत्याही वाहनाला टोल बूथवर पैसे भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेबाबत लोकसभेत मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, पुढच्या वर्षभरात टोल वसुलीची प्रणाली संपूर्ण बदलली जाईल. आता टोल हा फक्त इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे स्वीकारला जाणार आहे. याचा वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.
हिवाळी अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली 10 ठिकाणांहून सुरू करण्यात आली आहे आणि पुढील एका वर्षात ती संपूर्ण देशात विस्तारीत केली जाईल. यामुळे सध्याची टोल व्यवस्था पूर्णपणे बंद होईल, असे ते म्हणाले. टोलच्या नावाखाली कोणीही रोखणार नाही. एका वर्षाच्या आत, ‘इलेक्ट्रॉनिक टोल वसुली’ देशभरात लागू केली जाईल. गडकरी म्हणाले की, सध्या देशभरात 10 लाख कोटी रुपयांचे 4500 महामार्ग प्रकल्प सुरू आहेत.
नॅशनल पेमेंट्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल वसुली कार्यक्रम विकसित केला आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने फास्टॅग नसलेल्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला. या सवलतीअंतर्गत, जर एखाद्या वाहनाकडे फास्टॅग नसेल किंवा ते काम करत नसेल तर टोल प्लाझावर दुप्पट रोख कर देण्याऐवजी त्याला टोल टॅक्सच्या केवळ 1.25 पट रक्कम भरावी लागेल. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी
केली आहे.