जन्मदात्या आईने विकली स्वत:ची सहा मुले?

त्र्यंबक तालुक्यातील धक्कादायक घटना; चौकशी समिती गठित

घोटी : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घोटीजवळील भरड्याची वाडी येथे 14 मुलांच्या जन्मदात्या मातेने आपल्या सहा मुलांना पैशांसाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, संबंधित मातेने बुधवारी पुन्हा स्पष्ट सांगितले की, ते आम्ही दत्तक दिले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या दाव्यानंतर पोलीस आणि प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांच्या आदेशानुसार चौकशी समिती स्थापन केली आहे. दरम्यान, घोटी पोलिसांनी चौकशी समितीकडून जो अहवाल येईल त्याप्रमाणे दोषींवर गुन्हा दखल करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे.

नाशिक : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर येथील मूल विक्री प्रकरणाची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. पोलीस, डिस्ट्रिक चाईल्ड वेल्फेअर कमिटी, महिला व बालकल्याणचे चाईल्ड प्रोटेक्शन ऑफिसर यांच्यामार्फत प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणातील विक्री झालेल्या सर्व मुलांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिल्या आहेत.
जन्मदात्या आईने आपल्या बारापैकी सहा मुलांना विकल्याचा धक्कादायक दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्याने जिल्हाभरात खळबळ माजली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातून हा प्रकार समोर आला आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात महिला आणि तिच्या पतीला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बरड्याच्या वाडीत हा प्रकार उघड झाला आहे. महिलेची चौदावी प्रसूती झाल्यानंतर दोन महिन्यांनी ही वार्ता एका आशासेविकेमुळे पुढे आली. संबंधित महिलेची प्रसूती झाल्यापासून आशा कार्यकर्तीची नेमणूक करण्यात आली होती. बाळ सुरक्षित घरी आणले गेले होते. मात्र, काही दिवसांनी आशा कार्यकर्ती बाळाचे वजन घेण्यासाठी गेली असता, त्यांना ते बाळ तिथे आढळले नाही. या संदर्भात आईला विचारणा केली असता आधी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, आशासेविकेने प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर महिलेने कबुली दिली. आम्हाला मुलांना पोसणे परवडत नाही, म्हणून आम्ही त्यांना दत्तक म्हणून दिले, असे उत्तर संबंधित महिलेने दिले. बाळाला दूध पाजणे शक्य नव्हते आणि आर्थिक अडचणींमुळे तिने हा निर्णय
घेतला.

आई हॉस्पिटलमध्ये जात नव्हती, तिला रोज आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगत असत की सोनोग्राफी, रक्त तपासणी यासाठी तुला हॉस्पिटलला जावे लागेल. मात्र ती कोणाचे ऐकत नव्हती म्हणून ही घटना आरोग्य विभागाच्या अधिकार्‍याना सांगितली, तेव्हा त्या महिलेला प्रसूतीसाठी जबदरदस्तीने रुग्णालयात नेले. तिच्या घरचा कोणी नातेवाईक आला नाही, ती सुदैवाने सुखरूप प्रसूत झाली. त्यानंतर दोन महिन्यांनी आरोग्य कर्मचारी त्या बाळाचे वजन घेण्यासाठी तिच्या घरी गेले असता सदर महिलेकडे ते बाळा आढळून आले नाही. त्या महिलेला विचारले की, बाळ कुठे आहे, तेव्हा तिने सांगितले की बाळ मोठे करण्याची ऐपत नाही. म्हणून आम्ही विकले त्या बाळाला या महिलेने असेच आधी देखील तिचे बाळ विकलेले आहेत, अशी चर्चा आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी आजही गरिबांना पोटचा गोळा विकण्याची वेळ येत असेल, तर आदिवासींच्या नावाने होणारा खर्च कुठे जातो नक्की विकास आदिवासींचा की आदिवासी मंत्र्यांचा?
आदिवासी समाजाचा विकास व्हावा म्हणून राज्यात स्वतंत्र आदिवासी विभागाची निर्मिती केली त्या विभागाला एक मंत्री दिला. मात्र आजही या आदिवासी समाजाला पोटाचा गोळा विक्री करून आपल्या कुटुंब चालायला लागत असेल तर यासारखे दुर्दैवी काय? या कुटुंबाला शासकीय योजनापासून वंचित ठेवणार्‍या शासकीय यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे. या मातेला जीवदानदेखील एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे. सदर महिला आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी तयार नव्हती. आरोग्य यंत्रणेनेे हात टेकले. त्यानंतर त्यांनी एल्गार कष्टकरी संघटनेच्या सुरेखा मधे यांच्याशी संपर्क साधला. त्या स्वतः या महिलेच्या घरी गेल्या त्यांना समजून सांगितले, तेव्हा त्यांनी खुलासा करत बाळ आम्ही दत्तक दिले असून, चौकशी समिती तपास करीत आहे.

नऊ मुले जिल्हा महिला व बालकल्याणकडे

कुटुंबात 14 पैकी एक मूल मृत झाले. उरलेल्या तेरापैकी दोन मुलींचे लग्न झाले आहे. तीन मुले दत्तक दिली. सहा मुले कुटुंबाकडे होती. आता एकूण नऊ मुले महिला व बालकल्याण समितीकडे सोपविण्यात आली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *