वाडी-वस्त्यांवरून पायी, सायकलने येणार्या 535 विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य
सिन्नर ः प्रतिनिधी
तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या भीतीने
ग्रामीण भागातील जनता भयभीत झाली आहे. जनावरांवरील हल्ल्यांच्या पाठोपाठ बिबट्यांनी आता माणसांना देखील लक्ष्य बनवल्यामुळे तालुक्यात
शेतीकामाच्या वेळा बदलल्या. बिबट्याच्या धसक्यामुळे विद्यार्थीदेखील शाळांमध्ये यायला घाबरत असल्याने त्यावर पर्याय म्हणून आता थेट शाळांच्या वेळा बदलण्यात येत आहेत. वावी येथील रयत शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाची वेळ बदलली असून, एक तास शाळा लवकर भरवून सायंकाळी एक तास लवकर सोडण्यास सुरुवात केली आहे.
वावी विद्यालयात दहावीपर्यंत सुमारे 1000 विद्यार्थी शिकतात. त्यापैकी साडेपाचशे विद्यार्थी मीठसागरे, निमोणीचा
मळा, पिंपरवाडी, दुशिंगवाडी, कहांडळवाडी, घोटेवाडी, वल्लेवाडी, फुलेनगरसह जवळच्या वाडी व वस्त्यांवरून सायकलने अथवा पायी ये-जा करत असतात. पैकी दुशिंगवाडी, घोटेवाडी, कहांडळवाडी या तीन गावांमधून विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा आहे. बहुतांश विद्यार्थी थेट गावातून न येता
मळ्यांमधून येत असल्याने त्यांच्यासाठी ही बस गैरसोयीची असते. या सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच बिबट्याच्या दहशतीतून दिलासा देण्यासाठी शालेय व्यवस्थापनाने शिक्षण विभागाच्या परवानगीने शाळेची वेळ बदलली असून, एक तास शाळा लवकर भरवून सायंकाळी एक तास लवकर सोडवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता सायंकाळी पाचऐवजी चार वाजताच शाळेतून बाहेर पडतात. तासाभरात विद्यार्थी घरी परतत असल्यामुळे पालकांनादेखील यामुळे दिलासा मिळाला आहे.
पायी, सायकल व बसने येणारे विद्यार्थी
फुलेनगर 66, निमोणीचा मळा 20, कहांडळवाडी 110, वल्लेवाडी 59, घोटेवाडी 90, दुशिंगवाडी 59, मीठसागरे 16, पिंपरवाडी 11. बसने येणार्या विद्यार्थ्यांची संख्या : कहांडळवाडी 23, वल्लेवाडी 16, घोटेवाडी 55, दुशिंगवाडी 10.
परिसरातील सर्वच गावांमध्ये बिबट्याचा वावर आढळून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती होती. सायंकाळी पाच वाजता शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत यायला एक तास जायचा. नेमकी हीच वेळ शिकारीसाठी बिबट्यांची बाहेर पडण्याची असते. विद्यार्थी लवकर घरी परतत असल्यामुळे बिबट्याबद्दलची दहशत कमी व्हायला मदत होईल.
– सुधाकर भगत, पालक, फुलेनगरविद्यालयात वाडी आणि वस्त्यांवरून येणार्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्यापेक्षा जास्त आहे. बिबट्याच्या भीतीमुळे या विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असल्याने शाळा लवकर भरवण्याचा निर्णय घेतला. विद्यालयात गुरुकुलचे वर्ग घेतले जात असल्याने सकाळी दहाऐवजी नऊ वाजता मुलांना शाळेत बोलावले जाते. पालकांशी चर्चा करूनच शाळेची नवीन वेळ निश्चित केली आहे.
-शहाजी मकासरे, मुख्याध्यापकवाडी व वस्त्यांवरून येणार्या विद्यार्थ्यांनी एकत्रित प्रवास करण्याची सूचना करण्यात आली आहे. पालकांनीदेखील मुलांच्या शाळेच्या नवीन वेळेनुसार नियोजन करावे. गावातून मळ्यापर्यंत मुले एकटी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
– रामनाथ कर्पे, शालेय समिती अध्यक्ष