पंचवटी : प्रतिनिधी
घराच्या दरवाजाला कुलूप असल्याची संधी साधून कडी-कोयंडा व लॅच तोडून आत शिरलेल्या चोरट्यांनी भरदिवसा सव्वा लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात घडली. याप्रकरणी आडगाव पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. धीरजसिंग डोगरसिंग राजपूत (वय 38, रा. साई एम्पायर, कैलासनगर, मिर्ची हॉटेलजवळ, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी त्यांची पत्नी मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेल्या. तिथून 45 मिनिटांत परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. घरात शिरलेल्या चोरांनी कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे तीन मंगळसूत्र, चांदीचे पैंजण, पितळी शिवलिंग, तसेच रोकड असा एक लाख 13 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. हवालदार बहिरम तपास करत आहेत.