मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे अभिनेत्री केतकी चितळे सध्या चर्चेत आहे. त्याचवेळी दोन वर्षांपूर्वीच्या एका जून्या प्रकरणाचीही आता चर्चा होऊ लागली आहे. २०२० मध्ये ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात न्यायालयाने केतकीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तरीही तेव्हा तिला अटक झाली नव्हती. मात्र आता केतकीवर कारवाई झाल्याने या प्रकरणातही तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..
काय आहे प्रकरण?
रबाळे पोलीस ठाण्यात केतकी चितळेवर २०२० मध्ये ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळूनदेखील नवी मुंबई पोलिसांनी तिला अटक केली नव्हती. पोलिसांनी कारवाई करण्यात चालढकल केल्याचा आरोप तक्रारदार स्वप्नील जगताप यांनी केला आहे.