बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे लासलगावात तरुण गंभीर जखमी

लासलगाव : वार्ताहर

उच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातलेली असतानाही लासलगाव शहरात सर्रास नायलॉन मांजाचा वापर सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याच नायलॉन मांजामुळे तीसवर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना लासलगाव येथे घडली आहे. येथील दत्त मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून अक्षय नहाटा हा तरुण दुचाकीवरून घरून दुकानात जात असताना अचानक नायलॉन मांजा त्याच्या तोंडाजवळ अडकला. धारदार नायलॉन मांजामुळे अक्षयच्या चेहर्‍यावर गंभीर जखम झाली आहे. तोंडाजवळ तब्बल 21 टाके पडले आहेत. जखमी अवस्थेत त्याला तत्काळ लासलगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाकडून नायलॉन मांजावर बंदी असतानाही शहर व परिसरात नायलॉन मांजाची खुलेआम विक्री आणि वापर सुरू आहे. नायलॉन मांजा विक्रेत्यांविरोधात लासलगाव पोलिसांकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्याच्या कुटुंबांनी केला आहे. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *