शहरात ‘हरित नाशिक’ वृक्षलागवड मोहिमेचा आज शुभारंभ

टप्प्याटप्प्याने 15 हजार देशी वृक्षांची लागवड, 15 फूट उंच झाडांचा समावेश

नाशिक : प्रतिनिधी
शहराचा श्वास मोकळा करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला नवे बळ देण्यासाठी नाशिकमध्ये आजपासून (दि. 15 डिसेंबर) भव्य वृक्षलागवड मोहीम सुरू होत आहे. “आपले नाशिक हरित नाशिक” या संकल्पनेवर आधारित “हरित नाशिक” मोहिमेचा शुभारंभ सोमवार, दि. 15 डिसेंबर 2025 रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
महानगरपालिका व प्रशासनाकडून या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, शहरातील विविध ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने खड्डे खोदून माती व खताची व्यवस्था करण्यात आली आहे. झाडांंच्या जाती व आकारमान लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेतली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मखमलाबाद परिसरातील कॅनॉललगत सर्व्हे नं. 69 येथील नाशिक महानगरपालिकेच्या सुमारे अडीच एकर हरितपट्ट्यात तसेच गोदावरी नदीकिनारी सुयोजित प्रकल्प परिसरात पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार देशी प्रजातींच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. याच कार्यक्रमात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजनही होणार आहे.
या उपक्रमाला जिल्ह्यातील सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी, मान्यवरांसह राष्ट्रीय संत समितीचे महंत, महामंडलेश्वर, महामंत्री तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील तेरा आखाड्यांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय श्री स्वामी समर्थ दिंडोरीप्रणीत सेवा केंद्र, जगद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराज, अण्णासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्वामिनारायण संस्थान, इस्कॉन आदी आध्यात्मिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व भक्तगण सक्रिय सहभाग घेणार आहेत.
मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून आंध्र प्रदेशातील राजामुंद्री येथील नर्सरीमधून 10 ते 15 फूट उंचीची देशी प्रजातींची झाडे नाशिकमध्ये उपलब्ध झाली आहेत. टप्प्याटप्प्याने एकूण पंधरा हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. ही झाडे सीएसआर निधी व लोकसहभागातून उपलब्ध होत आहेत.
लोकसहभाग वाढावा यासाठी “हरित नाशिक” मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पणही यावेळी करण्यात येणार आहे. या अ‍ॅपद्वारे नागरिकांना आपल्या परिसरात वृक्षलागवडीसाठी नावनोंदणी करता येणार आहे. एखादी संस्था किंवा व्यक्ती 25 किंवा त्याहून अधिक वृक्ष लागवडीची मागणी केल्यास, उपलब्ध जागेनुसार प्रशासनाकडून झाडे देण्यात येणार आहेत.
पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत क्रेडाई, आयमा, निमा, नरेडको, पर्यावरण गतिविधी, सायकलिस्ट्स असोसिएशन यांसह अनेक नामवंत सामाजिक व सेवाभावी संस्थांनी सहकार्य केले आहे. ‘हरित नाशिक’ मोहिमेच्या यशासाठी जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांकडून करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *