कोण होणार धुरंधर..? Who will be the winner..?

महापालिकेच्या 122 जागांसाठी इच्छुकांचे उदंड पीक

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक कामाला लागले आहेत. भाजपाकडून इच्छुक उमेदवारांची परीक्षा, मुलाखती असे सोपस्कार पार पाडले जात आहेत. राज्यातील बदललेल्या परिस्थितीमुळे यावेळी इच्छुकांचे उदंड पीक आले आहे. मावळत्या महापालिकेत भाजपाचे सतीश कुलकणी यांनी महापौरपद भूषविले. गेल्या तीन वर्षांत राजकीय परिस्थिती मोठ्या प्रमाणात बदलली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची शकले उडाली आहेत. पक्ष दोन गटांत दुभंगल्याने इच्छुक दावेदार वाढले आहेत. त्यात भाजपा केंद्रात व राज्यात सत्तेत असल्यामुळे भाजपाकडून निवडणूक लढवू इच्छिणार्‍यांची संख्या तिपटीने वाढली आहे. एका जागेसाठी किमान दहा जण दावेदार असल्याने उमेदवारी वाटप करताना भाजपा नेतृत्वाचा मोठा कस लागणार आहे. अशा परिस्थितीत कोण धुरंधर ठरणार? याकडे लक्ष लागले आहे.
मागील वेळेस झालेल्या निवडणुकीत भाजपाला 66, शिवसेनेला 35, राष्ट्रवादी, काँग्रेस यांना प्रत्येकी सहा, मनसेला पाच, रिपाइं एक आणि अपक्ष चार, असे नगरसेवक निवडून आले होते. तीन वर्षांत फाटाफूट झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक शिंदे गटात, तर काही भाजपात गेले. भाजपातून निवडून आलेले शिंदे गटात गेले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता भाजपाला महापालिकेवरील सत्ता कायम ठेवायची आहे. कधीकाळी नाशिक शहरातील महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा वरचष्मा होता; परंतु भाजपाने पाय रोवता-रोवता शिवसेना ठाकरे गट थेट भाजपापेक्षा निम्म्यावर आला आहे. आता तर ठाकरे आणि शिंदे गट अशा दोन गटांत शिवसेना दुभंगली आहे. शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ आणि पॉवरफुल मंडळी शिंदे गटात गेली आहे. त्यामुळे ठाकरेंना राहिलेल्या सैनिकांवरच ही निवडणुकीची लढाई लढावी लागणार आहे. मागील पंचवार्षिकला अनेक ठिकाणी ठाकरे गटाने वर्चस्व मिळविले होते. सिडकोत सुधाकर बडगुजर यांच्या प्रभागात ठाकरे गटाचे, तर नाशिकरोडलाही काही भागांत ठाकरेंचा करिष्मा होता. पण आता बडगुजर भाजपात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रभागात ठाकरेंना तोडीस तोड लढत देऊ शकतील असे उमेदवार शोधावे लागणार आहेत.
सातपूर भागातही दिनकर पाटील यांचे वर्चस्व होते. मागील वेळेस ते भाजपात होते. त्यामुळे त्यांच्या प्रभागातील चारही उमेदवार हे भाजपाचे निवडून आले होते. आता दिनकर पाटील विधानसभा निवडणुकीनंतर मनसेत गेले आहेत. त्यामुळे येथे भाजपाला तोडीसतोड उमेदवार द्यावे लागणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांची ताकद शहरात ठराविक प्रभागांतच आहे. पक्षीय पातळीवर काँग्रेस अथवा शरद पवार गटाची फारशी बांधणी नाही. शहरातील राष्ट्रवादीला प्रभावी चेहरा नाही. काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. डॉ. हेमलता पाटील यांनी शिवसेना शिंदे गट व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असा प्रवास केला आहे. मनसेची सर्व मदार सुदाम कोंबडे, दिनकर पाटील यांच्यावर आहे. भाजपामध्ये नव्याने पक्षात आलेले आणि जुने निष्ठावंत असा संघर्ष अटळ आहे. अशा परिस्थितीत भाजपाकडून निष्ठावंतांवर उमेदवारी देताना अन्याय झाल्यास ते शांत राहणे पसंत करतात की, ऐनवेळी बंडखोरी करून इतर पक्षांत जातात यावरही निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. पक्षाच्या गळाला ऐनवेळी चांगले चेहरे लागले तर ठाकरे गट, शरद पवार गट यांची लॉटरी लागू शकते. महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे ठरत असले, तरी मनसेला सोबत घेण्यावरून काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांची आघाडी होऊ शकते. शिंदे गटाकडे भाजपानंतर मोठा ओढा आहे. त्यात भाजपाने शंभर प्लसचा नारा दिलेला आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटाला सोबत घेतल्यास जागावाटपात तिढा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भाजपा कदाचित स्वबळावर निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपा यांनी युती तोडली आहे. नाशिकमध्येही भाजपा कदाचित शिवसेना शिंदे गटाशी मिळतेजुळते घेण्याऐवजी स्वतंत्र लढून नंतर सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात, अशीसुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. पक्षीय फाटाफुटीमुळे वाढलेल्या इच्छुकांमुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांची परीक्षा पाहणारी आहे. अशा परिस्थितीत धुरंधर कोण ठरणार? याकडे लक्ष लागले आहे.

मागील पक्षीय बलाबल
भाजपा                                66
शिवसेना                             35
राष्ट्रवादी                            06
काँग्रेस                                06
अपक्ष                                 04
रिपाइं                                 01

After the election for 122 seats in the Nashik Municipal Corporation has been announced, those interested are now working to secure their candidature.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *