सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर तालुक्यातील मोहदरी शिवारात मंगळवारी (दि.16) सकाळी विहिरीजवळील पाण्याने भरलेल्या नाल्यात एका बेवारस पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेची खबर मोहदरी येथील पोलीसपाटील श्रावण जांबा गायकवाड (वय 38) यांनी पोलिसांना दिली. त्यांनी फोनद्वारे दिलेल्या माहितीनुसार, जयंत आव्हाड यांच्या विहिरीजवळील नाल्यात पाण्यावर तरंगणारा एक पुरुषाचा मृतदेह आढळला होता.
ही माहिती मिळताच एमआयडीसी सिन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता मृतदेह हा अंदाजे 35 ते 40 वर्षे वयोगटातील बेवारस पुरुषाचा असल्याचे निष्पन्न झाले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पुढील तपासासाठी अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 95/2025, बीएनएसएस कलम 194 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक बिडगर करीत आहेत. मृताची ओळख पटविण्याचे कामी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Body of orphaned man found in Mohdari Shivara