आई, मला मोरपीस दे ना..!

कुणी मला काळीज काढून द्यायला सांगितलं तर तिथं तुम्हाला विविधरंगी सुगंधी फुलं अन् निरागस मुलं नक्की भेटतील.घराच्या अंगणात दरवळणारी फुलं आणि शाळेच्या प्रांगणात चिवचिव करणारी मुलं! या गोजिर्‍या मुलांसोबत शाळेचा वेळ कसा सरतो कळत नाही.त्यात पहिलीचा वर्ग म्हटलं तर विचारूच नका. अंगणवाडी सोडून शाळा नावाच्या विशाल प्रांगणात रूजण्यास सज्ज झालेली ती निरागस मुलं.. त्यांची लडिवाळ बोबडी बोली, हजारो प्रश्नांची प्रश्नावली.. हे सारं आनंद देणारं!नित्य नवं शिकवणारं! रोज येणारे अनुभव ही एक शिदोरीच म्हणा. जी गोड लागते. पुन्हा पुन्हा हवीहवीशी वाटते. जी संपू नये वाटते.. अशी!!
असाच एक अनुभव. मध्यान्न भोजनाची वेळ. मुलांनी खाऊवाल्या मावशींकडून खिचडी घेतली. रांगेत बसून त्यांचं जेवण सुरू झालं. शाळा गावाच्या मुख्य रस्त्यावर असल्यानं लोकांची ये-जा चालू होती. त्याकडं आमचं विशेष लक्ष नव्हतं पण एका विद्यार्थ्याच्या आईनं व आजीनं हाक मारल्यानं मला आणि माझ्यासोबतच्या मॅडमलाही जावं लागलं.
सासू आणि सून दोघी शेतात निघाल्या होत्या. त्यांची तीन मुलं पहिली, तिसरी आणि पाचवी तिन्ही वर्गात असल्यानं त्यांच्या अभ्यासाबद्दल बोलणं झालं. मग आम्हा बायकांच्या गप्पा असतात तशा इकडच्यातिकडच्या.. माहेरच्या.. सासरच्या.. आधी कोणत्या गावाला शिकवायला होत्या? कुठं होतं? अशा आपुलकीच्या जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. एरवी त्यांनाही वेळ नसतो आणि आम्हालाही. आज मध्यांतर असल्यानं आम्हाला निवांतपणा भेटला आणि योगायोगानं त्यांची भेट झाली.
बोलताबोलता त्या ताई माझ्याकडं पाहत म्हणाल्या, मॅडम तुमच्या पेनला मोरपीस लावलं आहे का?
मी म्हटलं, हो. पण तुम्हाला कसं समजलं? आणि का विचारताय?
आमचा गोलू म्हणत होता, आई आमच्या मॅडमच्या पेनला मोरपीस लावलेलं आहे. ते लावल्यानं त्यांना चांगलं लिहीणं येतंय. म्हणून त्या मॅडम झाल्यात. आई तू शेतात जातीस तर मला मोरपीस आणून दे असा रोज धामा लावलाय.
त्यांचं बोलणं ऐकून क्षणभर मला काय बोलावं कळलंच नाही.आपल्यावर किती बारीक लक्ष असतं या पोरांचं याचं नवल वाटलं. हा माझ्या पहिलीच्या वर्गातील हनुमान. ससोबा अर्थात गोलू. गोल-गुबरा, हसरा, गोड बोलणारा! सर्वांचा लाडका. तसा माझाही!
आमच्या गप्पा रंगल्या होत्या. पण आमच्या जेवणाची वेळ झाली होती अन् त्यांनाही शेतात जायचं असल्यानं आम्ही एकमेकींचा निरोप घेतला.
नंतर गप्पा मारतच आमचं जेवण सुरू झालं. अधूनमधून माझ्या मनात गोलूचेच विचार. वाटलं गोलूच्या मॅडमला तर या मोरपंखाचं.. ते धारण करणार्‍याचं वेड आहेच अन् आता गोलूही त्याच रंगात रंगावा?
काय जादू आहे या मोरपंखात?हे मोरपीस राधेच्या जीवनावर फिरलं.. तिचं प्रेम अमर झालं! हे मोरपीस गोपगोपींच्या जीवनावर फिरलं त्या सार्‍यांना प्रेमाचा अर्थ उमगला! हे मोरपीस सुदाम्याच्या जीवनावर फिरलं त्याची मैत्री अमर झाली!
हेच मोरपीस अर्जुनाच्या जीवनावर फिरलं.. त्याला कुरुक्षेत्रावर गीताज्ञान कळलं.. जीवनज्ञान कळलं! आणि माझं काय झालं?
विचाराचं चक्र थांबत नव्हतं. माझ्या देहानं क्षणात मोराचं रूप घेतलं!पान गळतीनंतर झाडाला पुन्हा पालवी फुटावी त्याप्रमाणं माझ्या देहातून एक एक मोरपीस बाहेर येताना दिसू लागलं. माझ्या गोलूला लिहिणं येण्यासाठी फक्त एक मोरपीस हवं होतं. पण माझ्यासमोर अशी कितीतरी मुलं उभी राहिली ज्यांना शिक्षणाची आस आहे. ज्यांना शिकून मोठं व्हायचंय. त्यांची स्वप्नं साकार करायचीत. आई-वडिलांच्या कष्टाच्या जगण्यात सुखाचा किरण आणायचाय. अशी कितीतरी मुलं एक एक करत माझ्याजवळ येऊ लागली. तशीतशी माझी मोरपंखाची संख्याही वाढत होती. पाहता पाहता ती मोरपीसं खाली गळू लागली. माझ्याभोवती असलेली मुलं ती मोरपीसं वेचू लागली. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून माझं मन सुखावून गेलं!
शेवटी मला भेटायला तो मोरमुकुटधारी आलाच! त्याचं काय वर्णन करू? आपोआप माझं हृदयकमळ फुललं. मग आमच्याही गप्पा झाल्याच की!जाता जाता माझ्या जीवनावर मोरपीस फिरवत म्हणाला, सखे, तुझी काहीतरी पुण्याई बघ. तू शिक्षिका झालीस. किती छान गं हे! नवनिर्माणाची संधी तुला रोज मिळतेय. मन लावून शिकव. या पोरांच्या डोळ्यात प्रचंड आशा आहेत. जगण्याची धडपड आहे. त्यांच्या कुटुंबाचा उद्याचा आधार बनणारी मुलं तुला घडवायची आहेत. मार्ग अवघड आहे पण त्यांचा हात धर. त्यांचं जीवन उजळून टाक. तुझ्या जीवनावर फिरलं तसं शिक्षणाचं मोरपीस त्यांच्याही जीवनावर फिरू दे. त्यांचं जीवन आनंदानं भरू दे. तशी तुला सांगायची गरज नाही पण विसर पडू नये म्हणून पुन्हा पुन्हा सांगतोय.
एवढं बोलून ती निळी सावली दूर गेली. त्या निळाईतून मन बाहेर आलं.बहरून आलं. मध्यांतराची वेळ संपली. मी वर्गात गेले. आधी गोलूला कुशीत घेतलं! निरागस.. निष्पाप जीव! अन् त्याच्या सारखीच माझ्याकडं आशेनं बघणारी इतर मुलं!!
खरंच माझी पुण्याई! देवा, या जीवांवर शिक्षणरूपी मोरपीस फिरवता फिरवता मोक्ष लाभू दे.. एवढंच!!

Mom, give me some moringa.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *