मोठे घर… धाकटे घर…

नेहमीचेच झाले आहे हे मोठ्या घरचे… कोणतंही कार्यक्रम असला तरी थोरले म्हणून ह्यांच्याच घरी साजरा होणार. गावाकडचे लोकं काय यांच्याच घरी आधी येणार. सणवार, महालक्ष्म्या, दिवाळी… आम्हीच आपलं आपल्या घरातील सर्व आवरून, दो- तीन दिवस त्यांच्याकडेच राहायला, मदत करायला, खरं म्हणजे राबयला जायचं… जन्मभर ते मोठे आणि आम्ही लहानच राहणार आहोत. धाकटे असले तरी काय झालं…आम्हालाही वाटत असेल ना, आमच्याही घरी कोणी यावे, आम्हालाही मान द्यावा, गप्पांच्या मैफली, चहा-कॉफीचे राउंंड, खाण्याच्या फर्माईशी, आवडीचे जेवण, सगळे जण जमल्यानंतरची धमाल आमच्याही मुलांनी अनुभवावी… नेहमी काय जायचं ते आम्हीच आश्रितासारखं… त्यांनीही कधीतरी यावं की, लहान्या जावेकडे, तिचा संसार पाहावा, आदरातिथ्य घ्यावे, निवांत राहावे. आता आम्ही ही रूळलोय म्हणावं संसारामध्ये… न थांबवता येणारी बडबड तिने जशी सुरू केली तशी तो गाडी धुण्याच्या निमित्ताने मोठा पाइप घेऊन तो बाहेर आला. तसं पहिलं तर तिचेही काही चूक नव्हते. लग्नाला 15 वर्षे झाली होती. मुलंही आता कळती झाली होती. त्यांच्याही काही ळीलहर होत्या. एक बाप म्हणून तिकडेही लक्ष देणे जरुरी होते.
पण तो तरी काय करूं शकत होता. घरचे वळणच तसे होते. दादाकडेच सर्व कार्यक्रम होत असत. आईही आप्पा गेल्यापासून दादाकडेच राहत असे तसं त्याच्याही घरी येऊन आवडीने राहत असत. त्यापण आप्पांचे सर्वकाही उठणे, बसणे, राहणे त्या घरीच गेल्यामुळे त्यांचेही साहजिकच होते. तो स्वतःसुद्धा दादाच्या घरीच राहत नव्हता कां मोठ्या मुलीच्या जन्मापर्यंत…. पण ऑफिसच्या सोसायटीचा प्लॉट मिळाला म्हणून त्याच्या सर्व मित्रांनी मिळून थोडीशी गावाबाहेर मोडणारी अशी जागा घेतली आणि पाहता पाहता गावाबाहेर वाटणारे त्याचे घर चांगलेच वस्तीमध्ये सामावू लागले. गिरणी, शाळा, मंदिरं, लग्न कार्यालय.. सगळं सगळं झालं. आता तर त्यांना गावातही यायची फारशी गरज पडत नसे. इतक्या सर्व सुखसोयीनेयुक्त झाली होती त्यांची सोसायटी.
गाडी धुण्याच्या निमित्ताने आपण बाहेर आलो, हा प्रश्न अन उत्तरित ठेवला तरी दिवसेंदिवस बिकट होणार्‍या यां प्रश्नाचे काय करावे हे त्याच्या समजुतीच्या पलीकडे होते आणि… आता तर सणवार तोंडावर, मोठा पेच होता त्याच्यासमोर… पण जेव्हा त्याने आपल्या घरासमोर थांबलेल्या दादाच्या गाडीतून आई, मोठ्या वहिनी, दादा, आणि त्यांची मुले ह्यांना गाडीतून उतरताना पाहिले तेव्हा त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसला नाही…
अरे, धरतोयस ना आईला, कां पाहतच राहणार आहेस नुसता शुंभासारखा आणि आईला आरामखुर्चीत बसवून लगेच बाहेर ये, बरेच सामान काढायचे आहे डिकीतून. चांगलं चार दिवस तुझ्या घरी मुक्काम करायचा विचार आहे तुमच्या मोठ्या वहिनी साहेबांचा. मला म्हणते कशी, जाऊयात हो आपण भाऊजींकडे राहायला. एवढं छान घर बांधलंय, पुढे मागे अंगण, बागबगीचा, माझ्या आवडीची कमळंसुद्धा आहेत आणि जरा निवांत राहू हो. मुलंही जातील इथूनच शाळेत, कॉलेजात, भाऊजींची मुलं नाही जात कां? आणि सासूबाईंनाही महादेवाचं मंदिर जवळ आहे, त्यांची करमणूक होईल आणि वेळही चांगला जाईल. आलो बाबा, लवाजमा घेऊन सगळा तुमच्या घरी आता, आपण काय हुकमाचे ताबेदार …
बाहेर काय गलका ऐकू येतो आहे हे पाहायला आलेल्या तिच्या तोंडाचा आ वासला गेला. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. आनंदाने आणि आश्चर्याने ती नुसतीच उभी राहिली…
आपण 15 दिवसांपूर्वी व्यक्त केलेली लहर लगेच पूर्ण झाली हे तिला रुचेचना, आपण कल्पवृक्षाच्या खाली बसून तर बोललो नाही हे… झालं… आणि काय आठ दिवस नुसती धमाल, खाणं, पिणं, गडबड गोंधळ, मुलांची मस्ती, रात्री सिनेमा पाहणे, सकाळी उशिराने जाग… दोघी जावांनी मिळून केलेला स्वयंपाक.. मज्जा आली अगदी… आता तुला 4/5 दिवस पुरेल बाई पसारा आवरायला हो गं मोठ्या जाऊबाईने विचारले आणि हळूच म्हणाल्या…
यावर्षीपासून एक नियम करूयांत गं महालक्षम्या आपल्या त्या घरी, तर नवरात्र-घट आपल्या या घरी. गणपती तर दोन्ही घरी बसतातच आणि दिवाळी एकेक वर्षी आलटून-पालटून… हो ना सासूबाई, असंच ठरवायचं ना… सर्व जिकडेतिकडे झाले. मागचा नंतरचा पसाराही आवरून झाला. तिला अतीव समाधान मिळाले होते. तिच्या मनासारखं झालं होतं, घडलं होतं…. पण हे झाले कसे?… तर झाले होते असे. तिच्या घरी काम करणार्‍या रखमाने भांडी घासता घासता ऐकलं सगळं. आणि सहज म्हणून लहान्या घरी असं म्हणत होत्या वहिनी, बरोबर हाय न त्यांचं बी, नेहमीच काय म्हून शान त्यांनी मोठ्या घरी राबायचं.त्यांना बी वाटत असन ना त्यांच्या घरी बी मोठे संबदे यावेत, आपुनबी त्यांची आव भगत करावी…
ही गोष्ट शेजारी राहणार्‍या ध्रुपदाबाईजवळ पारावर गप्पा मारता मारता बोलून गेली. ध्रुपदाबाई होत्या मोठ्या घरी कामाला…आपला पहिला चहा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे ध्रुपदाने.. दुसरा चहाचा कप आपल्यासमोर ठेवणार्‍या.. मालकिणीला ही सारी हकीकत तिखटमीठ लावून, खमंग फोडणी देऊन… मोठ्या जाऊबाईंच्या कानावर घालायची आपलीच नैतिक जबाबदारी आहे असें शंभर टक्के गृहीत धरून सर्व राम हाणी तिने मोठया घरच्या कानावर घातली…
वाईटातून नेहमी चांगलंच निघतं ह्यावर दृढविश्वास असणार्‍या मोठ्या जाऊबाईंनी हे सगळं पॉझिटिव्ह घेतलं….
खरं आहे तिचं अगदी. 15 वर्षे झाली तिच्या लग्नाला. पुढच्या वर्षी तिची मुलगी जाणती होईल. तिची अपेक्षा आणि भूमिका ही काही चूक नाही, उलट आपल्यालाही एक नवीन अँगल मिळाला विचार करायला… तिने आपले मन नवर्‍याजवळ मोकळे केले तर बिघडले कुठे? उलट आपल्याला तिच्या मनातली खदखद समजली हे बरेचदा झालें. यां धुमसणार्‍या खदखदीचे ज्वालामुखीमध्ये रूपांतर होऊन तिसरेच काहीतरी उभे राहण्यापेक्षा हे ध्रुपदाकडून समजले हे छानच झाले…. असा जरासा वेगळा विचार करून नवर्‍याशी आणि सासुशी सखोल चर्चा करून सणवार साजरे करण्याबद्दल विचारविनिमय केला आणि सर्व काही ठरले आणि पार पडलेदेखील…
एखाद्याचा चुगली करण्याचा स्वभाव असलेल्या व्यक्तीची चहाडी किंवा चुगलीसुद्धा आपली बायको किती सकारात्मक घेऊ शकते…आणि चहाडखोरीदेखील दोन व्यक्तींना जोडणारा पूल होऊ शकतो. नव्हे, आपल्याला बायकोने बनवले याचा सार्थ अभिमान दादासाहेबांना वाटला आणि … अतिशय कौतुकाने त्यांनी आपल्या धर्मपत्नीकडे पाहिले आणि हसूनच त्यांची नजर ओळखून ह्यांचं आपलं काहीतरीच असं हसतहसत पुटपुटत मोठ्या जाऊबाई स्वयंपाकघरात गेल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *