विकासाची पर्वणी

नाशिकमध्ये दोन वर्षांनंतर सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हजारो कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. ती कामे मार्गी लावण्याची लगबग सुरू आहे. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या हस्ते पाच हजार कोटींच्या कामाचा शुभारंभ झाला. त्यानंतर गत सोमवारी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सातशे कोटींच्या कामाचे ई-भूमिपूजन झाले. सिंहस्थाकडे दृष्टिक्षेप टाकल्यास लक्षात येईल की, यावेळचा सिंहस्थ नाशिकच्या विकासाला बूस्टर देणारा ठरेल. यातून आधुनिक नाशिकच्या निर्मितीबरोबरच पर्यटनक्षेत्र म्हणून शहराची ओळख बनेल. याचे कारण म्हणजे, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी प्रथमच मंजूर झालेला 25 हजार कोटींचा प्रचंड निधी होय. प्रस्तावित कामांद्वारे विकासाची पर्वणी नाशिककरांना मिळणार आहे.
विशेषत: याद्वारे नाशिकचे महत्त्व राज्यातच नव्हे, देशभरात वाढेल.  –  गोरख काळे.

नाशिक महापालिकेचे बजेट अडीच हजार कोटींचे असून, त्यात शहरातील रस्त्यांसह मूलभूत कामांवर खर्च होतो. मोठे प्रकल्प मार्गी लावले जातील एवढा निधी महापालिकेकडे नाही अन् तेवढी महापालिकेची क्षमताही नाही. वर्षभरात कर्मचार्‍यांच्या वेतनावरील खर्च नऊशे कोटींवर आहे. केंद्राकडून महिन्याला जीएसटीपोटी 124 कोटींचा निधी दिला जातो. त्यातूनच अधिकारी-कर्मचार्‍यांसह सेवानिवृत कर्मचार्‍यांचे निवृत्तिवेतन दिले जाते. महापालिका शहरात स्वनिधीतून एखादा मोठा प्रकल्प सुरू करू शकेल एवढी क्षमता राहिलेली नाही. पंधरावा वित्त आयोग, तसेच अमृत योजनेतून थेट पाइपलाइनसह पाणीपुरवठ्याच्या योजनेला निधी मिळाला आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने भरघोस निधीमुळे नाशिकमध्ये हजारो कोटींची कामे दीड वर्षात पूर्णत्वास जाणार आहेत. सिंहस्थ निधीद्वारे सध्या पंधराशे कोटींचा एसटीपी प्रकल्प, दोन हजार कोटींच्या रस्त्यांपैकी तेराशे कोटींच्या 27 रस्ते कामांच्या निविदा प्रसिद्ध, 62 कोटींचे पाच पूल ही कामे होणार आहेत. शहरात तीन हजार सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. त्यामुळे रस्ते, विमानतळ, नाशिकरोड रेल्वेस्थानक, साधुग्राम विकास, पाणीपुरवठा (गुरुत्ववाहिन्या), गोदावरी नदी स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होणार आहेत. यामुळे नाशिकला तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून विकसित केले जाईल. त्याअनुषंगाने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. पंचवटीत दीडशे कोटी खर्चून रामकाल पथ साकारला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या महत्त्वाकांंक्षी आध्यात्मिक कॉरिडॉरसाठी 99 कोटी व राज्य शासनाने 46 कोटी मंजूर केले आहेत. सिंहस्थापूर्वीच रामकाल पथ पूर्णत्वास न्यायचा आहे. सध्याच्या घडीला सिंहस्थ निधीद्वारे पायाभूत सुविधा पूर्ण करण्याबरोबरच सिंहस्थ परिक्रमा म्हणजेच रिंगरोड, रस्ते, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांचा विकास साधला जात आहे. गोदावरी नदीत स्वच्छ पाणी आणण्यासाठी 25 किमीच्या गुरुत्ववाहिन्या टाकल्या जातील. यासाठी एकूण 1250 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
भाविकांना स्नानासाठी स्वच्छ पाणी मिळावे म्हणून नदीच्या उगमापासून कुशावर्त कुंडापर्यंत प्रदूषण रोखण्याचे काम या प्रकल्पाद्वारे केले जाणार आहे. त्र्यंबकेश्वरला जोडणार्‍या दहा रस्त्यांची कामे (सुमारे 2,350 कोटी) होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली तयार केली आहे. 25 हजार कोटी रुपयांची कामे अपेक्षित असून, केंद्र व राज्य सरकारकडून निधीची तरतूद केली आहे. एकीकडे शहरात कोट्यवधींची कामांना मुहूर्त लागला असताना, गेल्या काही दिवसांपासूनच सिंहस्थावरून कोणतेना कोणते वाद निर्माण होताना दिसत आहेत.
प्रथमत: सिंहस्थासाठी हजारो कोटींची कामे क्लब टेंडरिंगद्वारे करण्याचा निर्णय शासनाने घेतला. शासनाचा हेतू शुद्ध असला, तरी विशिष्ट ठेकेदारांसाठीची सोय असे आरोप केले गेले. पण गुणवत्तापूर्ण कामासाठीच हा निर्णय घेतल्याचे शासनाने म्हटले. हा वाद शांत होत नाही तोच तपोवनामधील वृक्षतोडीचा वाद पेटला आहे. 14 जानेवारीपर्यंत हरित लवादाने झाडे तोडण्यास स्थगिती दिली आहे. साधुग्राममधील जमिनी देण्यास शेतकर्‍यांनी विरोध केला आहे. रोख मोबदल्यावर ते अडून बसले आहेत. यावेळी कधी नव्हे एवढा वाद सिंहस्थापूर्वी होताना दिसत आहे. मात्र, असे असले, तरी शहरात येत्या काही दिवसांत विकासाची कामे नजरेत भरणारी असतील.
विशेषतः आतापर्यंतच्या सिंहस्थात विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला नाही. तो यावेळच्या सिंहस्थात प्रथमच मिळतो आहे. म्हणून सिंहस्थ कामांद्वारे आधुनिक नाशिकची निर्मिती पुढील काही वर्षांत झालेली दिसेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *